सांगली, मिरज पालिका क्षेत्रात घरपोच मोफत ऑक्‍सिजन पुरवठा

अजित झळके
Friday, 11 September 2020

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णाला गरजेनुसार घरपोच मोफत ऑक्‍सिजन पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णाला गरजेनुसार घरपोच मोफत ऑक्‍सिजन पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. येथील कोरोना रुग्ण साह्य आणि समन्वय समितीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याकामी दहा पोर्टेबल मशीन खरेदी करण्यात आली असून त्यातून अनेकांचे प्राण वाचणार आहेत, असा विश्‍वास समितीचे सतीश साखळकर यांनी व्यक्त केला. 

कऱ्हाड येथे पद्धतीचा उपक्रम सुरु असल्याची माहिती समितीला "सकाळ'च्या बातमीतून समजली. त्यानंतर हालचाली सुरु झाल्या. कोरोना रुग्ण साह्य व समन्वय समितीने शहरातील दानशूर व्यक्तीना पोर्टेबल ऑक्‍सिजन मशीन देण्याचे आवाहन केलोहते. त्याला प्रतिसाद मिळाला. दानशूर व्यापारी बांधवानी 10 पोर्टेबल ऑक्‍सिजन मशीन दान केल्या. बुधवारी सायंकाळी 6 वाजता मशीन ताब्यात घेण्यात आल्या. त्याची सोशल मीडियातून चर्चा झाली आणि त्याच रात्री 12 वाजता पहिली मशीन देण्यात आली.

पहाटे तीन वाजता एकाने मशीन नेले. समितीतील इतर सदस्यांना रात्रीपासून प्रचंड फोन येत होते. सकाळी सर्व सदस्यांना प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर त्या मशीन सुपुर्द करण्यात आल्या. अशा पद्धतीने रुग्णांवरील संकट दूर करण्यात हातभार लागल्याचे समाधान साखळकर यांनी व्यक्त केले. आता ही चळवळ बनावी, ऑक्‍सिजन पुरवणारी एक साखळी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी शहरातील वेगवेगळे उपक्रम साजरे करणारे मंडळे, व्यापारी बांधव, उद्योगपती, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

या मशीनसाठी साखळकर यांच्यासह उत्तम साखळकर, अभिजित भोसले, महेश खरडे, ज्योती आदाटे, प्रशांत भोसले, लालू मेस्त्री, तानाजी रुईकर, जयंत जाधव, सनी धोत्रे, प्रदीप कांबळे, अमर निंबाळकर, राहूल पाटील, धनंजय वाघ, अश्रफ वांकर, मकसूद भादी, स्वप्नित खोत, रवी खराडे, अविनाश जाधव, आनंद देसाई यांच्याशी संपर्क साधावा. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Oxygen Supply at Home in Sangli, Miraj Municipal Area