मोहिद्दीन मुल्लाचा मित्रानेच काढला काटा; आर्थिक देवाण-घेवाणीतूनच कृत्य

शैलेश पेटकर
Wednesday, 3 February 2021

वारणानगर येथील नऊ कोटींच्या लूट प्रकरणातील मुख्य आरोपी मोहिद्दीन अबुबकर मुल्ला याचा खून पैशाच्या देवाण-घेवाणीतूनच झाल्याचे आज तपासात स्पष्ट झाले.

सांगली : वारणानगर येथील नऊ कोटींच्या लूट प्रकरणातील मुख्य आरोपी मोहिद्दीन अबुबकर मुल्ला याचा खून पैशाच्या देवाण-घेवाणीतूनच झाल्याचे आज तपासात स्पष्ट झाले. जिगरी मित्रानेच मुल्लाचा काटा काढल्याचे समोर आले असून, शहर पोलिसांनी यापूर्वीच चौघांना अटक केली आहे.

रवी हरी चंडाळे (वय 36, रा. शिवाजी मंडई), शफीक अजमुद्दीन खलिफा (वय 45, रा. जोतिबा मंदिराजवळ, सांगलीवाडी), नाना ऊर्फ बाळासाहेब दादासाहेब पुकळे (वय 37, रा. राणाप्रताप चौक, सांगलीवाडी), आप्पा ऊर्फ भीमराव मल्लाप्पा वाणी (वय 36, रा. झाशी कॉलनी, सांगलीवाडी) अशी त्यांची नावे आहेत. चौघांना शनिवारपर्यंत (ता. 6) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मोहिद्दीन मुल्ला आणि वाणी हे दोघे जिगरी मित्र होते. मात्र, त्यांच्यात पैशाच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपूर्वी वाद होत होता. वाणीने मुल्लाला काही रक्कम दिली होती. वाणी हा ती रक्कम मुल्लाकडे परत मागत होता. मात्र, मुल्ला पैसे देण्यास असमर्थ होता. त्यामुळे त्यांच्यात पैशावरून वाद होत होते. हा वाद टोकाला गेला होता. त्यामुळे संशयितांनी संगनमताने मुल्लाचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. यापूर्वी मुल्लावर दोनदा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो अयशस्वी झाला होता. 

शुक्रवारी रात्री हल्लेखोरांनी कट रचला. मुल्ला हा गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात आल्यानंतर हल्लेखोरांनी नियोजनबद्धपणे मुल्लावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला. यावेळी संशयित शफीक खलिफा हाही यावेळी जखमी झाला. पोलिसांनी चौघा हल्लेखोरांना अटक केली आहे. 

पुकळेला व्हायचे होते "दादा' 
दरम्यान, मुल्ला खूनप्रकरणातील संशयित आरोपी नाना पुकळे याला "दादा' व्हायचे होते. त्यामुळे त्याने हल्लेखोरांना साथ दिल्याचे पोलिसांनी सांगितले; तर यातील संशयित आरोपी शफीक खलिफा यालाही त्याच्या कामाचा मोबदला मिळणार असल्याने तो या कृत्यात सामील झाला होता. आता सर्वचजण या खून प्रकरणात अडकले आहेत. 

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friend murdered Mohiddin Mulla