घाबरलेल्या चोरट्यांनी 48 तोळे दागिने आणून ठेवले छपरात.......वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य विस्कटून जवळ जवळ 48 तोळे सोने आणि दागिन्यांवर डल्ला मारला होता . बाजार भावाप्रमाणे सोन्याची किंमत बावीस लाख होते.

ढालगाव (जि. सांगली) : कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे विलास हिंदूराव कदम यांच्या घरातून चोरीस गेलेले 48 तोळे सोने त्यांच्याच शेतातील झोपडीत सोमवारी सापडले. संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्या कदम यांच्या घरातील या चोरीमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी लढविलेली शक्कल आणि घाबरलेले चोरटे यामुळे हा सारे दागिने परत मिळण्यात यश मिळाले. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : कदमवाडी येथे विलास कदम व त्यांची पत्नी दोघे राहण्यास आहेत. त्यांची मुले मुंबई येथे नोकरीस आहेत. त्यांचा एक मुलगा व सून 17 मे रोजी घरी आले होते. त्यांच्यातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याने घरातील व संपर्कातील 22 जणांना चार जूनपासून कवठेमहांकाळ येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे घरी कोणीही नव्हते. गावात त्यांच्या घराजवळील परिसर चार जूनपासून कंटेनमेंट झोन घोषित केला होता. तरीही घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरटे 10 जूनला घरात घुसले होते. त्यांनी घरातील सर्व साहित्य विस्कटून जवळ जवळ 48 तोळे सोने आणि दागिन्यांवर डल्ला मारला होता . बाजार भावाप्रमाणे सोन्याची किंमत बावीस लाख होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. 

सोमवारी सकाळी युवराज कदम व यशवंत कदम जनावरे चरवण्यासाठी विलास कदम यांच्या शेताजवळ गेले होते. शेतात निवाऱ्यासाठी केलेल्या छप्पर वजा झोपडीत त्यांना पिशवी व गाठोडं दिसले. त्यांनी उघडून पाहिले असता त्यात सोने दिसल्याने त्यांनी विलास यांच्या जवळचे नातेवाईक सतिश कदम यांना सांगितले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 

पोलिस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहूल कोळंबीकर व एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक अभिजित सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन झोपडीत सापडलेल्या सोन्याचा पंचांसमक्ष पंचनामा केला. कदमवाडीतच सोनाराला बोलावून सोन्याच्या दागिण्यांचे वजन करण्यात आले. 

पोलिसांचा इशारा आला कामी 
सोने चोरीस गेल्यानंतर पोलिसांनी तपास करताना गावात सर्वांसमोर चोरी करणारा चोर लवकरच सापडेल. चोरीबाबत ठोस धागेदोरे हाती मिळाल्याचे पोलिसांनी जाहीरपणे म्हटले होते. एवढ्या एका इशाऱ्यावरच चोरट्यांनी दागिने विलास कदम यांच्या छपरात आणुन ठेवले़़ पण चोरटे कोण, याबद्दलचे गूढ वाढले आहे. पोलिसांच्या नजरेतून चोरटे सुटणार नाही एवढे मात्र नक्की. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Frightened thieves 480 grams jewelry in roof