बेळगाव : यंदापासून विद्यार्थ्यांना गणवेश बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Student

बेळगाव : यंदापासून विद्यार्थ्यांना गणवेश बंधनकारक

बेळगाव - गेल्या काही दिवसांपासून हिजाब परिधान करण्यावरून सुरू असलेल्या वादामुळे पदवीपूर्व शिक्षण खात्याने नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये यापुढे गणवेश परिधान करणे बंधनकारक असणार आहे. २०२२ - २३ च्या शैक्षणिक वर्षाला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये, याची दक्षता आतापासूनच घेण्यास सुरुवात झाली आहे.

दोन महिन्यांपासून महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून या वादामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे काही दिवस महाविद्यालयासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. तसेच परीक्षा काळात देखील कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाला अधिक काळजी घ्यावी लागली होती. राज्यातील अनेक पदवीपूर्व महाविद्यालयांनी यापूर्वीच विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती केली आहे. मात्र, यापुढे राज्यातील सर्वच महाविद्यालयांना गणवेश सक्ती लागू करावी लागणार असून हा नियम भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांकांच्या संस्थांना देखील लागू होणार आहे.

महाविद्यालयांमध्ये धार्मिक वाद निर्माण होऊ नयेत, याची काळजी घेण्याची सूचना उच्च न्यायालयाने देखील सरकारला केली होती. त्यामुळे न्यायालयाच्या सूचनेनुसार सर्व महाविद्यालयांमध्ये गणवेश सक्ती काटेकोरपणे लागू करावी, अशी सूचना सर्व पदवीपूर्व महाविद्यालयांना शिक्षण खात्याने केली आहे. त्यामुळे आतापर्यंत गणवेश सक्ती न केलेल्या सर्व महाविद्यालयांना शिक्षण खात्याच्या सूचनेचे पालन करावे लागणार आहे.

बारा दिवस दसऱ्याची सुटी

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला शुक्रवार (ता. २० ) पासून सुरुवात होणार आहे. तसेच दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर ९ जूनपासून पदवीपूर्व महाविद्यालयाला सुरुवात होणार आहे. ९ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्पामध्ये पदवीपूर्व महाविद्यालय सुरू राहणार असून १ ते १२ ऑक्टोंबरपर्यंत दसऱ्याची सुटी आहे. तर १३ ऑक्टोबरपासून महाविद्यालयांना पुन्हा सुरुवात होईल.