"एफआरपी' ची चातकाप्रमाणे प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

महिन्यापूर्वी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सर्व साखर कारखान्यांना ऊस बिलाची रक्कम द्यावी, असे आदेश दिले होते; मात्र जिल्ह्यातील कारखान्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

सांगली -  साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम मिळालेली नाही. सध्या खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत; मात्र ऊस बिलाची रक्कम हातात नसल्यामुळे पावसाळा तोंडावर येऊनही तो प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील दहा कारखान्यांकडे "एफआरपी' ची 233 कोटींची रक्कम थकीत आहे. "कोरोना' मुळे आर्थिक संकटात शेतकरी सापडला असून ऊस बिलाची तो चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. 

जिल्ह्यात संपलेल्या गळीत हंगामात 12 साखर कारखान्यांनी साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीत 66 लाख 79 हजार 385 टन उसाचे गाळप केले. त्यापासून 82 लाख 46 हजार 849 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे, तर अडचणीमुळे चार साखर कारखाने सुरू होऊ शकले नाहीत. साखर कारखान्यांनी त्यांच्याकडे गळीतास आलेल्या उसाची रक्कम वेळत द्यावी यासाठी ऊस नियंत्रण आदेश 1966 च्या कलम 3 (3) मध्ये तरतूद आहे. त्यानुसार हंगामात गाळप केलेल्या ऊस बिलाची रक्कम 14 दिवसांत देणे बंधनकारक आहे. कारखान्यांनी वेळेत एफआरपीची रक्कम न दिल्यास कलम 3 (3 ए) नुसार विलंब कालावधीसाठी 15 टक्के व्याज आकारण्याची तरतूद कायद्यात आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. महिन्यापूर्वी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सर्व साखर कारखान्यांना ऊस बिलाची रक्कम द्यावी, असे आदेश दिले होते; मात्र जिल्ह्यातील कारखान्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. 

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने उलटले आहेत. लॉकडाउनमध्ये शेतकरी शांत होता; मात्र आता संयम सुटू लागला आहे. शेतकरी संघटनांनीदेखील तत्काळ "एफआरपी' ची रक्कम द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना सध्या तत्काळ बी-बियाणे, खते-औषधे, पेरणी आदी कामांसाठी पैशाची गरज आहे. अशावेळी साखर कारखान्यांनी तत्काळ ऊस बिलाची रक्कम द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 

कारखान्यांची थकीत एफआरपी 

कारखाना-----------------थकीत एफआरपी (लाखात) 
वसंतदादा दत्त इंडिया------- 6909.51 
राजारामबापू साखराळे-------4977.47 
राजारामबापू वाटेगाव--------2481.57 
हुतात्मा वाळवा-------------2272.74 
सोनहिरा वांगी--------------1047.58 
क्रांती कुंडल---------------1667.06 
मोहनराव शिंदे--------------103.54 
सर्वोदय-राजारामबापू--------1860.47 
निनाईदेवी-दालमिया---------845.50 
उदगिरी शुगर---------------1133.70. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FRP problem sangli district