गुन्हा दाखल केला तरच अंत्यसंस्कार - नातेवाईक व गिरवले समर्थक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नगर : न्यायालयीन कोठडीत असलेले नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले यांच्या निधनावरून पेच निर्माण झाला आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळेच गिरवले यांचा मृत्यू झाला असून, या संदर्भात गुन्हा दाखल करून न घेतल्यास गिरवले यांचे पार्थिव पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांनी आणि गिरवले समर्थकांनी घेतला आहे. 

नगर : न्यायालयीन कोठडीत असलेले नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले यांच्या निधनावरून पेच निर्माण झाला आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळेच गिरवले यांचा मृत्यू झाला असून, या संदर्भात गुन्हा दाखल करून न घेतल्यास गिरवले यांचे पार्थिव पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांनी आणि गिरवले समर्थकांनी घेतला आहे. 

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी आणले असताना जगताप समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर 7 एप्रिलला रात्री हल्ला करून जगताप यांना घेऊन गेले होते. त्या प्रकरणात गिरवले अटकेत असून, या काळात त्यांना पोलिसांनी प्रचंड मारहाण केल्या असल्याचा आरोप आहे. यामुळेच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना पुणे येथे ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान काल रात्री त्यांचे निधन झाले. यामुळे गिरवले यांचे नातेवाईक आणि समर्थक संतप्त आहेत.

गिरवले यांचे बंधू बाबासाहेब यांनी काल पुणे येथे बंडगार्डन पोलीसांकडे तक्रार देऊन काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे त्यात टाकली आहेत. आज शवविच्छेदनानंतर गिरवले यांचे पार्थिव नगरला घेऊन येत असताना सुपे येथे काही काळ थांबले. तेथे नातेवाईक व समर्थक यांची बैठक झाली. गिरवले यांच्या पत्नी निर्मला कैलास गिरवले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पोलिसांविरोधात फिर्याद द्यायची. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्यास गिरवले यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्यास गिरवले यांचे पार्थिव थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात न्यायचे व संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करेपर्यंत अंत्यसंस्कार करायचे नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. 

दरम्यान, प्रशासनानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी याबाबतचा अहवाल राज्य व केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबतचा घटनाक्रम त्यांनी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह जिल्ह्यात दक्षता घेण्याचे आदेश पोलीसांसह प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: funeral after fir against police said by girawales relatives