मातब्बरांच्या उमेदवारीने तिसंगीत काटाजोड लढत 

पंडित सावंत- सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

असळज - गगनबावडा तालुक्‍यातील जिल्हा परिषदेचा तिसंगी गट यंदा खुला राहिल्याने अनेक मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तरी खरी लढत कॉंग्रेसच्या सतेज पाटील गटाचे भगवान पाटील आणि जिल्हा बॅंक संचालक भाजपचे पी. जी. शिंदे यांच्यातच होईल असे चित्र आहे. माजी सभापती बंकट थोडगे हे देखील येथून शिवसेनेच्या तिकिटावर उभे आहेत. 

असळज - गगनबावडा तालुक्‍यातील जिल्हा परिषदेचा तिसंगी गट यंदा खुला राहिल्याने अनेक मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तरी खरी लढत कॉंग्रेसच्या सतेज पाटील गटाचे भगवान पाटील आणि जिल्हा बॅंक संचालक भाजपचे पी. जी. शिंदे यांच्यातच होईल असे चित्र आहे. माजी सभापती बंकट थोडगे हे देखील येथून शिवसेनेच्या तिकिटावर उभे आहेत. 

तिसंगी गट हा पंचायत समितीच्या तिसंगी व कोदे बुद्रुक गणांत विभागला असून गटाची एकूण मतदारसंख्या 12,711 आहे. तिसंगी गण सतेज पाटील गटाचा तर कोदे बुद्रुक गण पी. जी. शिंदे गटाचा बालेकिल्ला आहे. तिसंगी मतदारसंघातून गत तीन निवडणुकीपैकी 2002 मध्ये सतेज पाटील गटाने तर 2007 व 2012 निवडणुकीत शिंदे गटाने विजय मिळवला. 

डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील गटाने तालुक्‍यात राजकीय पकड मजबूत ठेवली आहे. शिंदे व नरके गटातील अनेक "मोहरे' पाटील गटात आल्याने ही पकड आणखीच मजबूत झाली आहे. पी. जी. शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे यंदा निवडणुकीने वेगळे वळण घेतले आहे. शिंदे गटातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना सोडचिठ्ठी दिली असली तरी शिंदे यांना मानणारा गट तालुक्‍यात आहे. शिंदे भाजपचे उमेदवार असल्याने आमदार सतेज पाटील यांचे विरोधक माजी आमदार महादेवराव महाडिक व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिंदे यांच्या मागे मोठी रसद उभी केली आहे. 

माजी जि. प. सदस्य भगवान पाटील हे पी. जी. शिंदे यांचे खंदे समर्थक होते. पण दोन वर्षांपासून ते आमदार सतेज पाटील गटात सक्रिय झाले आहेत. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी या जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून अनेक विकासकामे केली. कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि अनुभव हे त्यांचे प्लस पॉईंट आहेत. जिल्हा बॅंक निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी व पी. जी. शिंदेच्या पराभवासाठी आमदार सतेज पाटील गटाने त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी देऊन आपली सर्व ताकद त्यांच्या मागे उभी केली आहे. 

भगवान पाटील व पी. जी. शिंदे यांच्यात चुरस जरी असली तरी सर्वसामान्यांच्या प्रश्‍नासाठी तसेच मदतीसाठी धावणारे बंकट थोडगे हे देखील शिवसेनेकडून रिंगणात आहेत. गेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीने 1278 मते मिळविली होती. त्यामुळे यंदा ते किती मते घेणार आणि त्याचा फायदा कोणाला होणार हे पाहणे रंजक असणार आहे. 

Web Title: gaganbawda zp election