दरवर्षी जल्लोषात होणारे गणरायाचे स्वागत यंदा साधेपणाने   

अजित कुलकर्णी 
Friday, 14 August 2020

विघ्नहर्त्या गणरायाचे दरवर्षी जल्लोषात होणारे स्वागत यंदा कोरोनामुळे ठंडेच होणार आहे.

सांगली : विघ्नहर्त्या गणरायाचे दरवर्षी जल्लोषात होणारे स्वागत यंदा कोरोनामुळे ठंडेच होणार आहे. कोराना विषाणू संसर्गामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग दिसत नाही. शहर तसेच ग्रामीण भागातही दरवर्षी मंडळांची वाढणारी संख्या यंदा कमी झाली आहे. 

गणेशोत्सव धडाक्‍यात साजरा करण्याची दीर्घ परंपरा असणाऱ्या मंडळांनीही यंदा कोरोनामुळे हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. केवळ मूर्ती प्रतिष्ठापना करुन दैनंदिन पूजा-अर्चा करण्याचे नियोजन सुरु आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींसह सामान्य लोकही हडबडल्याचे चित्र आहे. कोरोनाचे हे अभूतपूर्व संकट सण, समारंभ, उत्सवावर परिणाम करणारे ठरत असल्याने लोक वैतागले आहेत. ऑगस्ट महिन्यात तर रुग्णांची उच्चांकी संख्या आढळत असल्याने प्रशासकीय यंत्रणेलाही हात टेकावे लागत असल्याचे चित्र आहे. सांगलीचा पंचायतन संस्थान गणपती हा सर्वदूर प्रसिध्द आहे. 

भव्य मुर्तीं, मनमोहक आरास, नेत्रसुखद विद्युतरोषणाई, रंगारंग कार्यक्रमांनी गणेशोत्सवाची धूम असते. यंदा मात्र कोरोनामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे उत्सव तोंडावर आला तरी बाजारपेठेत शांतता आहे. मूर्ती विक्रेते तसेच सजावट साहित्य विक्रेते, धास्तावले आहेत. मूर्तीचा आकार लहान व मर्यादित ठेवण्याच्या सूचना असल्याने यंदा मोठ्या मुर्त्याची निर्मिती कमीच झाली आहे. दरवर्षी आगाउ 
रक्‍कम घेउन मुर्तीं तयार करणारे कारागीरही कोरोना संकटामुळे हबकले आहेत. शहरातील प्रमुख रसत्यांसह इतर ठिकाणी लागणारे मुर्ती विक्रीचे स्टॉलही कमी झाले आहेत. बहुतांश स्टॉलवर छोट्या मुर्त्या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. 

कोरोनामुळे मुर्ती विक्रीवर थोडाफार परिणाम होण्याची शक्‍यता आहे. अजून म्हणावा असा ग्राहकांचा उत्साह दिसत नाही. पेण तसेच कोल्हापूरच्या मुर्ती विक्रीची गेली 53 वर्षांची परंपरा आहे. यंदा मुर्तींच्या दरात 5 टक्‍के वाढ झाली आहे. तरुण पिढीची पसंती पाहून सुमारे मुर्त्यांचे 110 प्रकार विक्रीस ठेवले आहेत. सार्वजनिक उत्सव असला तरी यंदा कोरोनामुळे तो घरगुती स्वरुपात अधिक उत्साहाने साजरा करण्याचा "ट्रेंड' आहे. 
- विजय कुलकर्णी, मुर्ती विक्रेते, हरभट रोड, सांगली 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganaraya, which is held in Jallosha every year, is simply welcomed this year