मिरजेमध्ये डामडौल टाळून 186 मंडळांचे उत्साहात गणेश विसर्जन...शिस्त मोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई 

miraj visarjan.jpg
miraj visarjan.jpg

मिरज(सांगली)- भव्य स्वागत कमानी नाहीत, वाद्यांचा गजर नाही, लोककलांचा आविष्कार नाही, कार्यकर्त्यांची गर्दी तर अजिबात नाही, तरीही गणेश भक्तांच्या प्रचंड उत्साहात येथील अनंत चतुर्थी विसर्जन सोहळा पार पडला. किरकोळ वादावादी वगळता शहरातील 186 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे विसर्जन शांततेने पार पडले. 

महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण विसर्जन सोहळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरज शहरातील अनंत चतुर्दशीच्या विसर्जन सोहळ्यातील डाम डौलास शेकडो वर्षांत प्रथमच कोरोनाने खिळ बसली. मुळातच कोरोनामुळे गणेश उत्सवातील उत्साहास मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे शासनानेही गर्दीमुळे होणा-या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी विसर्जन सोहळ्याच्या मिरवणुकीस परवानगी नाकारली. तरीही शहरातील काही अपवादात्मक मंडळे सोडता बाकी सर्व मंडळांनी पोलिसांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत विसर्जन मिरवणूक शांततेने पार पडली.

सकाळी 7 वाजल्यापासूनच वैयक्तिक घरे,आणि दुकान गाळ्यांमध्ये प्रतिष्ठापना केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जनास सुरुवात झाली. विसर्जनासाठी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाच्या केवळ चारच कार्यकर्त्यांना परवानगी असल्याने आणि वाद्ये,डॉल्बीसही बंदी असल्याने गणेश भक्तांनी या सर्व डामडौलास फाटा देऊन विसर्जनाचे नियोजन केले. यापैकी बहुसंख्य मंडळानी गणेश तलावातच गणेशाचे विसर्जन केले. तर काही मोजक्‍या मंडळांनी गणेश विसर्जनासाठी कृष्णा नदीकडे जाणे पसंत केले. मिरवणूक मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करत झुंडीने मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी या सर्व गणेश कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोपही मारही खावा लागला. पोलीस यंत्रणेने शहरातील प्रत्येक मंडळास मिरवणुकीचा मार्ग आणि मिरवणुकीची वेळ आणि नियम याबाबत लेखी समज दिली होती. तरीही काही मंडळानी राजकीय पाठबळावर झुंडीने मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना जागोजागी अटकाव करत तळ्यापर्यंत केवळ चारच कार्यकर्त्यांना जाण्याची अनुमती देऊन बाकी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. गणेश तलाव आणि कृष्णा घाट या ठिकाणी आरती करण्यासही परवानगी नाकारण्यात आल्याने याठिकाणी होणारा विलंब टळला आणि विसर्जन वेळेत आटोपले सकाळी सात ते सायंकाळी सहा या या वेळेतच विसर्जन करायचे असल्याने अनेक मंडळांनी तशा पद्धतीनेच विसर्जनाचे नियोजन केले. 

मिरज शहरातील अनंत चतुर्दशी या विसर्जन सोहळ्यास एक मोठी परंपरा आहे. अनेक वैशिष्ट्यांमुळे ही मिरवणूक दीर्घकाळ चालत असे. मिरवणुकीतील अनेक कलाविष्कार ही मिरज आणि आसपासच्या परिसरातील गणेश भक्तांसाठी एक नेत्रदीपक पर्वणी असे. परप्रांतातील लोककला, ढोल-ताशांची पथके, लेझीम वैशिष्ट्यपूर्ण देखावे, यासह अनेक कलाविष्कार हेही हजारो कलाकारांसाठीही उपजीविकेचे साधन होते. गेल्या 40 वर्षांपासून यामध्ये भव्य स्वागत कमान यांची भर पडली आणि हा मिरवणूक सोहळा अधिकच उठावदार झाला परंतु हा सगळा डामडौल एका कोरोना संसर्गाने थांबविला. आणि "गणपती बाप्पा मोरया" "पुढच्या वर्षी लवकर या". गणेशभक्तांच्या गजरात शहरातील गणरायाचे सार्वजनिक गणरायाचे विसर्जन पार पडले 

एक दृष्टिक्षेप 
* मिरवणुकी साठी केवळ दीडशे पोलिसांचा बंदोबस्त. 
* मिरवणुकीबाबतच्या नियमांची गणेश मंडळांना पूर्वकल्पना. 
* हुल्लडबाज कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चोप. 
* कृष्णा घाटावर पोलीस कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद. 
* पोलिसांशी पंगा घेणारे कार्यकर्ते रडारवर. 

संपादन : घनशाम नवाथे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com