गर्दी टाळण्यासाठी मिरजेत घरगुती गणेश विसर्जन कुंड 

शंकर भोसले
Monday, 31 August 2020

कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर महापालिकेकडून घरगुती गणेश विसर्जना दरम्यानची गर्दी टाळण्यासाठी मिरजेत फिरते जलकुंड कार्यान्वित करण्यात आले आहे.

मिरज : कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर महापालिकेकडून घरगुती गणेश विसर्जना दरम्यानची गर्दी टाळण्यासाठी मिरजेत फिरते जलकुंड कार्यान्वित करण्यात आले आहे. यंदा गणेशोत्सव भाविकांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सोशल डिस्टंन्स राखत अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला. यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रबोधन ही झाले.

महापालिकेने मुर्तीदान केंद्र सुरू केली. या केंद्रांमुळे प्रदुषण होणार नाही तलाव, नद्या, विहरी गाळमुक्त होतील हा मुर्तीदान केंद्रामागील उद्देश आहे. आज पर्यंत महापालिकेच्या मुर्तीदान केंद्रामध्ये जवळपास दोनशे पन्नासहून अधिक नागरिकांनी मुर्तीदान करून प्रमाणपत्रे मिळवली. या मुर्तीदान केंद्रास मिळालेल्या प्रतिसादानंतर आता महापालिकेकडून नवव्या आणि अकराव्य दिवशी मोठ्या संख्याने होणा-या गणरायांच्या विसर्जनांसाठी प्रभाग निहाय फिरते जलकुंडची सोय करण्यात आली आहे. यामुळे भाविकांची गणेश तलाव, कृष्णाघाटावर होणारी गर्दी कमी होईल.

सध्या मिरजेतील कोरोना बाधितांचा आकडा दीड हजारावर पोहचल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. तर यंदा सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या घटल्यामुळे गर्दी देखिल आटोक्‍यात आली आहे. तर अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिकेच्या मुर्तीदान केंद्रास मुर्तीदान करून विसर्जनादिनाची संभाव्य गर्दी टाळली आहे. 

शहरात कुठे असतील फिरती जलकुंडे 
किल्लाभाग, नरसिंह मंदिर, पंचशिल चौक, कनवाडकर हौद, चप्पल मार्केट, मल्लिकार्जून मंदिर, खंडोबा मंदिर, हिरा हॉटेल चौक, साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे पुतळा, ढोर गल्ली, पवार गल्ली, शास्त्री चौक, जवाहर चौक, महापालिका विभागीय कार्यालय, दत्त चौक, जिलेबी चौक, मनपा शाळा क्रमांक एक, पाटील हौद, रूंगठा उद्यान या ठिकाणी ही फिरती जलकुंडे घरगुती विसर्जनासाठी कार्यान्वित होणार आहेत. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesha immersion tank at Miraj to avoid crowds