पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद, गणेश भक्तांनी जपला साधेपणा

प्रसाद पाटील
Sunday, 23 August 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुरळप पोलिस ठाणे हद्दीतील 21 गावांपैकी 19 गावांनी सार्वजनिक उत्सव साजरा न करण्याचा तर दोन गावांनी "एक गाव, एक गणपती', असा निर्णय घेतला आहे.

येडेनिपाणी (सांगली) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुरळप पोलिस ठाणे हद्दीतील 21 गावांपैकी 19 गावांनी सार्वजनिक उत्सव साजरा न करण्याचा तर दोन गावांनी "एक गाव, एक गणपती', असा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी महापूर तर यंदा कोरोनाचे उत्सवावर सावट असल्याने गणेशभक्तांचा जल्लोष यंदा पाहायला मिळणार नाही. कुरळप पोलिसांनी गावागावांत बैठका घेऊन गणेश मंडळांचे प्रबोधन केले आहे. 

तांदुळवाडी, कुंडलवाडी येथे "एक गाव, एक गणपती' तर येडेनिपाणी, येलूर, इटकरे, कुरळप, चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रुक, वशी, लाडेगाव, कणेगाव, ठाणापुडे, देवर्डे, शेखरवाडी, करंजवडे, भरतवाडी, निलेवाडी, डोंगरवाडी येथे उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी परिसरात प्रत्येक वर्षी सामाजिक, विधायक व मनोरंजनात्मक असे उपक्रम राबवले जात असून मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो. गेल्या वर्षीही महापुराने सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाल्याने उत्सव साधेपणाने साजरा केला होता. 

दरम्यान, एरवी गणेश उत्सव म्हटले, की तरुणाईचा जल्लोष असतो; मात्र कोरोनामुळे हा उत्साह यंदा बघायला मिळणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत गणेशोत्सवाची आतुरता असते; मात्र कोरोनाचे महाराष्ट्रावर संकट आल्याने गणेशभक्तांनी सामाजिक भान दाखवत उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून परिसरात साधारण तीनशेहून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. 

- 21 पैकी 19 गावांत सार्वजनिक उत्सव रद्द 
- दोन गावांत "एक गाव, एक गणपती' 
- पोलिसांकडून मंडळांचे प्रबोधन 
- गेल्या वर्षी महापुराचा फटका, यंदा कोरोना 

तरुणाई आतुरतेने गणेशोत्सवाची वाट पाहते; मात्र यंदा कोरोनामुळे आमच्या गावातील सर्व मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेतला आहे.
- आशिष पाटील, मोरया गणेश मंडळ, येडेनिपाणी 

पोलिसांनी गणेश मंडळांना केलेल्या आवाहनाला मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला असून गणेशभक्तांच्या निर्णयाचे स्वागत करत आहोत.
- अरविंद काटे, ए. पी. आय, कुरळप पोलिस ठाणे

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav canceled due to police sangli district