मिरजेत प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

मिरज  शहरातील रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरात प्रवाशांना हेरून लुटणाऱ्या तिघा जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. तिघेही सराईत आणि गांजासाठी लूटमार करणारे अट्टल गुन्हेगार आहेत.

मिरज : शहरातील रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरात प्रवाशांना हेरून लुटणाऱ्या तिघा जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. तिघेही सराईत आणि गांजासाठी लूटमार करणारे अट्टल गुन्हेगार आहेत. अनिस अल्ताफ सौदागर (वय 23, रा. सुभाषनगर), ताजुद्दीन शरीफ बेपारी (19, रा. सांगली) आणि ताहीर दस्तगीर उगारे (24, रा. सुभाषनगर) अशी या तिघा संशयितांची नावे आहेत. तिघांकडून लूटमारीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

काही दिवसांपूर्वी 9 जानेवारीला संख (ता. जत) येथील डॉ. दगडू बापू काळे यांना रिक्षातून बोलवाड रस्त्यावर नेऊन तिघा चोरट्यांनी त्यांच्याकडील 20 हजार 300 रुपये आणि महागडा मोबाईल, असे 25 हजार रुपयांचे साहित्य लुटून नेले. या वेळी या तिघांनी त्यांना डोक्‍यात सळी तसेच हातावर चाकूने वार करून जखमी केले.

या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिरज बस स्थानकासमोर असाच प्रकार घडला आणि एका बस वाहकाला सहाशे रुपयांना लुटण्यात आले. सलग दोन दिवस हे प्रकार घडल्याने शहर आणि महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले.

या वेळी मिरज ग्रामीण, महात्मा गांधी चौक आणि शहर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तसेच गुन्हा अन्वेषणच्या कर्मचाऱ्यांनी या दोन्ही गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली; परंतु यापैकी सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या तिघांना लुटारूंना शोधून काढले आणि अटक केली.

ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार साईनाथ ठाकूर, पोलिस कर्मचारी संजय कांबळे, बिरोबा नरळे, सचिन कुंभार, जितेंद्र जाधव, अमित परीट, संदीप गुरव, विकास भोसले, शशिकांत जाधव या कर्मचाऱ्यांनी पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. तिघा जणांच्या टोळीकडून रेल्वे आणि बस स्थानक परिसरातील लूटमारीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang arrested looted Passenger at Miraj