गणपती बाप्पा मोरया... विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले असतानाही मारुती रोड, पुष्कराज चौक गर्दीने फुलून गेले होते. पारंपरिक गणपती संस्थानच्या गणरायाचे आगमनही साधेपणाने झाले.

सांगली : कोरोनाच्या संकटातही आजपासून गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. मंगलमूर्ती मोरया.... गणपतीबाप्पा मोरया...च्या जयघोषात घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले असतानाही मारुती रोड, पुष्कराज चौक गर्दीने फुलून गेले होते. पारंपरिक गणपती संस्थानच्या गणरायाचे आगमनही साधेपणाने झाले. 

गणेश चतुर्थीनिमित्त आज सकाळपासून मारुती चौक, बालाजी रोड, हरभट रोड आदी ठिकाणी बुकींग केलेल्या गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांची पाऊले वळली होती. पुष्पराज चौकानजीक असलेल्या विविध स्टॉलवर भाविकांनी गर्दी केली होती. मोरयाचा जयघोषात बहुतांशीजण गणरायाला घरी घेऊन जात होते. काही जागरुक भाविकांनी दोन दिवस आधीच गणरायांना घरी आणले होते. मारुती चौक परिसरात पूजा साहित्य, फळे खरेदीसाठी गर्दी झाली होती. शाडूच्या मूर्तींना गेल्या काही वर्षात मागणी वाढली आहे. आजही हेच चित्र दिसून आले. कोरोना असल्यामुळे भाविक तोंडावर मास्क लावूनच बाजारपेठेत आले होते. दुपारपर्यत घरोघरी गणरायांचे आगमन झाले.

 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक मंडळांनीही साधेपणाने गणेशोत्सव करण्याचे आवाहन केल्याने 229 गावांनी एक गाव गणपती बसवण्यास प्रतिसाद दिल्याचे सकारात्मक चित्र होते. 1922 मंडळांना प्रशासनाने परवानगी दिली होती. बहुतांश मंडळांनी यावेळी सजावटीस फाटा देत केवळ लहान मुर्ती बसवून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणरायाच्या आगमनप्रसंगी पावसाने उघडीप दिल्याने गणेशमूर्ती नेण्यासाठी भाविकांची बाजारपेठेत वर्दळ होती. 

 

गणपती पंचायतनचाही गणेशोत्सव साधेपणाने 
सांगली संस्थानचा गणेशोत्सव पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गणपती पंचायतन संस्थानचा गणेशोत्सव देखील साधेपणानेच साजरा करण्यात येणार आहे. संस्थानच्या गणेशाचीही आज साधेपणाने प्रतिष्ठापना झाली. परंतु दरवर्षीप्रमाणे काढण्यात येणारी शाही मिरवणूक रद्द करण्यात आली. गणपती मंदिरावर मात्र रोषणाई करण्यात आली होती. राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये परंपरेनुसार संस्थानच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी श्रीमंत राजलक्ष्मी पटवर्धन, कन्या पौर्णिमाराजे पटवर्धन आदी कुटुंबिय उपस्थित होते. 

 

दीड दिवसाच्या गणरायाला आज निरोप 
दीड दिवसांच्या गणरायाला उद्या रविवारी निरोप देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने प्रत्येक प्रभागात विसर्जन कुंड ठेवली आहेत. तर नागरिकांनाही घरीच गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहनही केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganpati Bappa Morya ... Welcome to Vighnaharta