सांगलीच्या गणपती मंदिरला 175 वर्षे पूर्ण 

ganesh mandir.jpg
ganesh mandir.jpg

सांगली-सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणपती मंदिराला आज चैत्र शुद्ध दशमीला 175 वर्षे पूर्ण झाली. सध्या जगावर "कोरोना' चे विघ्न आले असून ते दूर करावे अशी प्रार्थना आज अनेक गणेशभक्तांनी सोशल मिडियावरून केली.

 
सांगलीच्या गणपती मंदिराचा इतिहास पाहिला तर दोनशे वर्षाहून अधिक काळ मागे जावे लागते. मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव आणि चिंतामणराव पटवर्धन या चुलते आणि पुतण्यामध्ये सन 1799 मध्ये वाटणी झाली. चिंतामणराव मिरजेतून बाहेर पडले आणि सांगलीत नवी राजधानी करण्याचे ठरवले. गणेशदुर्ग हा भुईकोट किल्ला बांधायला सुरवात केली. तसेच आराध्य दैवत श्री गणपतीचे मंदिर बांधण्याचा संकल्प केला. सन 1811 मध्ये कृष्णाकाठावर गणेश मंदिराचे बांधकाम सुरू झाले. सन 1814 मध्ये पायाभरणी झाली. 30 वर्षानंतर काम पूर्ण होऊन भव्य आणि आकर्षक गणपती मंदिर साकारले. मंदिराच्या बांधकामासाठी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराचा नकाशा आणि जोतिबाच्या डोंगरातून काळा पाषाण आणला. अहिल्याबाई होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी आणले. त्यातून पंचायतनच्या पाच मूर्ती बनविण्यात आल्या. सन 1845 मध्ये चैत्र शुद्ध दशमीला मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व पूजाअर्चा विधी झाला. 
संगमरवरातील रिद्धी-सिद्धीसह श्री गणेशाची आकर्षक मूर्ती, मंदिराभोवती श्री चिंतामणेश्वर हे महादेवाचे मंदिर, चिंतामणेश्वरी हे देवीचे मंदिर, श्री सूर्यनारायण मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर अशी चार मंदिरे असून हे मंदिर म्हणजे सांगलीकरांचे श्रद्धास्थान आहे. 
सध्या सांगली संस्थानचे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखालील श्री गणपती पंचायत ट्रस्टचे कामकाज पाहिले जाते. आज चैत्र शुद्ध दशमीला 175 वर्षे पूर्ण झाली. परंतू "कोरोना' चे सावट असल्यामुळे भाविकांना गणेशाचे दर्शन घेता आले नाही. मंदिरात आज पुजारी आणि काही भक्त यांच्या उपस्थितीत पूर्जा-अर्चा झाली. आकर्षक सजावट आणि सोनेरी मुकूट परिधान केलेचा पूजेचा फोटो सोशल मिडियावर टाकण्यात आला. त्याला अनेकांनी अभिवादन करून "कोरोना' चे विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com