गॅस शवदाहिनी रोखणार प्रदूषण, लाकडांचा वापरही कमी 

बलराज पवार 
Saturday, 8 August 2020

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांकडून गॅस शवदाहिनीबाबत सातत्याने होणाऱ्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप आले.

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांकडून गॅस शवदाहिनीबाबत सातत्याने होणाऱ्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप आले. आज या गॅस शवदाहिनीचे लोकार्पण आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार यांच्या हस्ते झाले. 

सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. सन 2017 मध्ये नियोजन समितीकडून 58 लाख आणि शेड बांधकामसाठी मनपाकडून 19 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. या 58 लाख खर्चात गॅस दाहिनी उभारणीचे काम गुजरातच्या अल्फा इक्विपमेंट कंपनीने पूर्ण केले. त्यासाठीचे शेड आणि कट्टे बांधणीचे काम महापालिकेचे ठेकेदारांनी पूर्ण केले. आयुक्त नितीन कापडणीस यांनी गॅस दाहिनीचे काम तातडीने पूर्ण करून दाहिनी सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 

मनपा प्रशासनाने आयुक्त कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवस प्रयत्न करीत गॅस शवदाहिनीचे काम पूर्ण केले. आज सांगलीतील पहिल्या गॅस शवदाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर तिचे लोकार्पण करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीताताई सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, गटनेते युवराज बावडेकर, प्रभाग एकच्या सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेविका भारती दिगडे, माजी नगरसेवक बटु बावडेकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सतीश सावंत, शहर अभियंता परमेश्वर उर्फ आप्पा अलकुडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणील माने, उप अभियंता ऋतुराज यादव , उदय बेलवलकर, गणपती साळुंखे, रमेश मद्रासी उपस्थित होते.

गॅस दाहिनीत एक शव दहन करण्यास एक ते दीड तास लागतो. गॅसचा वापर होत असल्याने प्रदूषण होत नाही. त्यातून बाहेर पडणारा धूर मोठ्या चिमणीच्या सहाय्याने 100 फूट उंचीवर जातो. नागरी वस्तीतील प्रदूषण रोखण्यास मदत होईल. त्याचबरोबर 24 तास 12 शव दहन करता येतील अशी व्यवस्था आहे. 48 किलो गॅस एकावेळी वापरला जाणार आहे. पर्यावरणाचे प्रदूषण रोखले जाईल. 
आजपासून या गॅस दाहिनीच्या वापराला सुरवात झाली. आता लाकडांचा वापरसुद्धा कमी होऊन प्रदूषण रोखले जाईल. महापालिका क्षेत्रातील पहिली गॅस दाहिनी आज सुरू झाल्याने आयुक्त नितीन कापडणीस, सर्वच यंत्रणांचे नागरिकांनी स्वागत केले आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas cremation will prevent pollution