Video : देखा उसे जब आँख भरके रहे गये... उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह

Video : देखा उसे जब आँख भरके रहे गये... उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह

सातारा : स्त्रीत्व म्हणजे भावनेचा हुंकार...आणि ती भावना म्हणजे ती भाषा अन्‌ जातीच्या भिंती पलिकडे नेणारी प्रेरणा... या प्रेरणेतून जन्म घेणारी एखादी कलाही मग असते अगदी तशीच...जन्माने मराठवाड्यातील, मायबोली मराठीच्या कुशीत वाढलेल्या, हिंदी-इंग्रजी भाषेचे बोट धरून चालणाऱ्या आणि गझल प्रेमाच्या कलेमुळे उर्दू भाषेतही रमणाऱ्या, कलेच्याच अंदाजाने प्रशासनात वाटचाल करणाऱ्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी त्यांचे गझल प्रेम जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उलगडले.

मराठवाडा आणि हिंदी यांचे नाते जुने आहे. हा भाग स्वातंत्र्यांनंतर निजामाच्या संस्थानात होता. त्यामुळे अजूनही तेथील मराठी भाषिकांच्या बोली भाषेत उर्दूचा समावेश असतो. अशा मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे बालपण गेले. सर्जनशिलता आणि संवेदनशिलता होती म्हणून त्या कवितेशी अनुबंधीत झाल्या. कविता आणि मोनिका या जणू जुन्या मैत्रिणीच. कविता सूचत होत्या आणि कागदावर उतरत होत्या. पण कोणत्याही कलाकाराला आपल्यातील अपूर्णत्वाची जाणिव होत राहते. त्यातून त्या अस्वस्थ होत होत्या. एकेदिवशी त्यांची गझलशी भेट झाली. त्यांनी त्याचाच ध्यास घेतला. मिसरे, मतले, शास्त्र, मात्रा, यासाऱ्यात भावना गुंफूण त्यांनी प्रयत्नपूर्व गझल शिकून घेतली. गझल लिहिणाऱ्या कोणत्याही शायराला गलिब भुरळ घालतो. ये खलिश कहासे होती, जो जिगर के पार होता... हा शेर माहिती नाही, असा शायर शोधूनही सापडणार नाही. त्यांना अस्वस्थ करणाऱ्या भावना कागदावर येणे हे सृजन. या सृजनाशी मोनिका सिंह यांची मैत्री घट्ट झाली आहे.
 
प्रशासकिय सेवेत जायचे हेच ध्येय मोनिका सिंह यांनी उराशी बाळगले होते. माजलगांव येथून उच्च शिक्षणासाठी त्या औरंगाबदाला आल्या. औरंगाबाद म्हणजे उर्दू प्रेमींसाठी जणू स्वर्गच. याचे प्रमुख कारण तेथे उर्दू ऐकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एकीकडे स्पर्धा परिक्षेचा खडतर अभ्यास आणि दुसरीकडे गझलाची आवड मोनिकांना उर्जा देत होती. त्या काळी पालकांकडून पॉकेटमनी देणे असे काही नव्हते. आपणच साठविलेल्या पैशातून गझलच्या कॅसेट आवर्जून खरेदी करणे, त्या ऐकणे असा त्यांचा अभ्यासानंतरचा विरंगुळा असायचा. बोलता बोलता एकदा त्यांच्या तोंडून जगजितसिंह गुलाम अली, नूरजहॉं, मेहंदी हसन, रूना लैला, अशा दर्जेदार गायकांची जणू पारायणेच त्यांनी ऐकली. 1996 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उतीर्ण झाल्यावर जालना जिल्हा परिषदेत लेखाधिकारी वर्ग दोन म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली. तेथे येणारे अनुभव त्या नज्ममधून शब्दबध्द करू लागल्या. 1999 मध्ये मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून विविध ठिकाणी नियुक्ती झाली.

वाचा : महिलांनी अन्यायाविरोधात धाडसाने पुढे यावे : तेजस्वी सातपुते 

सध्या त्या सातारा जिल्ह्यात निवडणुक विभागाच्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मोनिका सिंह यांनी कोल्हापूरात कार्यरत असताना यशवंतराव चव्हाण मुक्ती विद्यापीठातून उर्दू भाषेत बीए केले. त्यानंतर त्यांनी एमए आणि एलएलबी ही केले आहे. त्यांची गझलांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यामध्ये 2016 मध्ये लम्स आणि 2020 मध्ये सहर के ख्वाब या पुस्तकांचा समावेश असून सहर के ख्वाब या पुस्तकाचे प्रकाश राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते झाले आहे. त्यांचा हा गझलांचा छंद प्रशासनातील काही लोकांनी कुचेष्टेचा केला. त्यांचे सांस्कृतिक विभागातच पोस्टींग हवे होते, अशा टिपण्या केल्या जात होत्या. पण दैनंदिन काम करत त्यांनी कविता करणे सोडलेले नाही. आपल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणी घेतल्यावर, त्यांनी लिहिलेला एक शेर आज अनेकजण सोशल मिडियावर पाेस्ट करतात. 

त्या म्हणतात, बोलना चाहा मेरे अल्फाज, फिर ओ ले गया, 
और क्‍या इससे बडी थी, ज्बते-दिलकी इंतेहा... 
आपल्या आवडीविषयी मोनिका सिंह म्हणतात, गझल ही माझी पॅशन आहे. कामातील आव्हानातून स्ट्रेस बस्टर म्हणून मी गझलकडे पाहते. आतापर्यंत चारशे ते पाचशे गझल मी लिहिलेल्या आहेत. तसेच साडेतीनशे ते चारशे नज्म लिहिल्या आहेत. ऑफिस आणि घर यामध्ये कधीच मी स्वत: ची कसरत होऊ देत नाही. ऑफिसच्या कामात मला सहकाऱ्यांचे तसेच घरच्या कामात कुटुंबातील सर्वांची मदत मिळते. उर्दू आणि मराठीत अनेक शब्द एकसारखे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांची नावे ही उर्दूतील शब्द आहेत. मराठी आणि उर्दू भाषा यांचे जवळचे संबंध आहेत, असे त्या आवर्जून सांगतात. 


कविता, गझल आणि मॅरेथॉनही.... 

कवितेत रूची असलेल्या मोनिका सिंह या फिटनेसबाबत जागृत आहेत. त्या नित्य नियमाने धावण्याचा सराव करतात. त्यातूनच त्या मॅरेथॉनकडे वळल्या. त्यापूर्वी त्या जिमही करायच्या. मॅरेथॉनची त्यांची आवड पुण्यात उपजिल्हाधिकारी म्हणून आल्यावर अधिक घट्ट होत गेली. पुण्यातील नव्या सहकाऱ्यांसमवेत त्यांनी विविध मॅरेथॉन पूर्ण केल्या. फिटनेस हाच वैचारिक प्रक्रियेचा स्त्रोत आहे. शासकिय कर्मचाऱ्यांसाठी फिटनेस अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांच्या संवादातून जाणवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com