esakal | महिलांनी अन्यायाविरोधात धाडसाने पुढे यावे : तेजस्वी सातपुते
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांनी अन्यायाविरोधात धाडसाने पुढे यावे : तेजस्वी सातपुते

पन्नास टक्के महिला असूनही विविध क्षेत्रांत समाजासाठी कार्य करणाऱ्या महिलांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे महिलांवर अन्याय होताना दिसतो. आज प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या महिलांची गरज असून, महिलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कर्तृत्व निर्माण करण्यासाठी पुढे यावे.

महिलांनी अन्यायाविरोधात धाडसाने पुढे यावे : तेजस्वी सातपुते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाई ः महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे असूनही दिवसेंदिवस मुलींच्या छेडछाडीचे व महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढत आहेत. समाजात आपली बदनामी होईल, या भीतीपोटी महिला अन्याय व अत्याचार निमुटपणे सहन करतात. त्याविरोधात बोलण्याचे धाडस करीत नाहीत. त्यामुळे अन्याय करणाऱ्यांची हिंमत वाढत असते. त्यासाठी महिलांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी येथे केले.
 
जागतिक महिला दिनानिमित्त येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयाने आयोजिलेल्या महिला सुसंवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. अभिनेत्री अश्विनी महांगडे व पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी वाई, भुईंज, पाचगणी, महाबळेश्वर व मेढा या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा व खेळाडूंचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोप देऊन सन्मान करण्यात आला. सातपुते यांनी आपल्या आयपीएस पदाच्या प्रवासाची माहिती उपस्थित विद्यार्थिनी व महिलांना दिली. त्या म्हणाल्या, ""पुरुषाप्रमाणेच महिलांमध्ये सर्व क्षमता असतात. त्यांचा विकास करावा आणि स्वतःचा स्वाभिमान जागृत ठेवावा. जीवनातील अडचणी व आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊन त्यावर मात करण्यासाठीचे सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण केले पाहिजे. पन्नास टक्के महिला असूनही विविध क्षेत्रांत समाजासाठी कार्य करणाऱ्या महिलांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे महिलांवर अन्याय होताना दिसतो. आज प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या महिलांची गरज असून, महिलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कर्तृत्व निर्माण करण्यासाठी पुढे यावे.''
 
अश्विनी महांगडे यांनी कलाकारांसाठी वाईत हक्काचे व्यासपीठ उभे केल्यास अनेक महिला अभिनयाच्या क्षेत्राकडे वळतील, असा विश्वास व्यक्त केला. 
या वेळी जॉय चिल्ड्रन ऍकॅडमीतील विद्यार्थिनी सिद्धी पांढरपोटे व सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वरच्या संगीता कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात श्रीमती विजयाताई भोसले, डॉ. जागृती पोरे, मंजिरी पानसे व विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या शंकाचे पोलिस अधीक्षकांनी समाधान केले. पोलिस ठाण्यातील महिला दक्षता समितींचे पुनर्गठण करून त्या कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना पोलिस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थिनी, विविध क्षेत्रांतील महिला, पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

हेही वाचा : भिऊ नका : पोलिस दल महिलांच्या पाठीशी

कर्तृत्ववान महिलांचा गौरव 

संवाद मेळाव्यात वाई ः अभिनेत्री अश्विनी महांगडे, उद्योजिका शीतल पिसाळ, महिला दक्षता समितीच्या डॉ. जागृती पोरे, कन्याशाळा अजन्म सेविका स्वाती शेंडे, रोटरी क्‍लबच्या स्वाती हेरकळ, भुईंज ः संस्कृती महिला बचत गटाच्या सुनंदा फरांदे, विजयालक्ष्मी बचत गटाच्या विजया कोळी, आपुलकी मतिमंद शाळेच्या सुषमा पवार, निर्मला पवार. पाचगणी ः डॉ. अरुणा रसाळ, योगिता भिलारे, ऍथलेटिक्‍स संजना केळकर, आदिती गोगडिया, डॉ. प्रियदर्शनी कांबळे, महाबळेश्वर ः पोलिस पाटील रुपाली केळघणे, सह्याद्री ट्रेकर्सच्या संगीता कोळी, सामाजिक कार्यकर्त्या सीमा ढेबे, सुषमा पाटील. मेढा ः राष्ट्रीय बॉक्‍सिंग खेळाडू यशश्री धनावडे, आदर्श शिक्षिका मुक्ताबाई धनावडे, पोलिस पाटील अनिता लकडे, जयश्री माजगावकर, व्यसनमुक्ती कार्यकर्त्या सरपंच वर्षा जवळ यांचा, तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. 

वाचा :  ती बाेलवते पण आपण जायचे नाही

loading image