महाव्यवस्थापक येणार, रेल्वे स्थानकांची पाहणी करणार 

प्रमोद जेरे
Monday, 18 January 2021

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचा कोल्हापूर ते सातारा या दरम्यानचा निरीक्षण दौरा निश्‍चित झाला आहे. 22 रोजी महाव्यवस्थापक मित्तल हे कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज, सांगली, आणि सातारा या स्थानकांना भेटी देणार आहेत.

मिरज : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचा कोल्हापूर ते सातारा या दरम्यानचा निरीक्षण दौरा निश्‍चित झाला आहे. 22 रोजी महाव्यवस्थापक मित्तल हे कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज, सांगली, आणि सातारा या स्थानकांना भेटी देणार आहेत. यावेळी ते या स्थानकांवरील प्रवाशांसाठीच्या सुविधा, रेल्वे मार्ग आणि मोठे पूल, डब्यांची देखभाल दुरुस्ती विभाग, नव्याने झालेली कामे याची पाहणी करणार आहेत. यावेळी कोल्हापूर, मिरज, सांगली या स्थानकांमध्ये भेटीप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनीधी आणि प्रवासी तसेच अन्य संघटनांशीही चर्चा करणार आहेत. 

कोरोना लॉकडाऊनंतर मिरज, कोल्हापूर, सांगलीच्या दौऱ्यावर येत असलेल्या महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या दौऱ्यास सध्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या चाकरमान्यांसाठीच्या सर्व स्थानिक गाड्या पूर्णपणे बंद आहेत. खासगीकरण झालेल्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्या पळवून रेल्वेने निव्वळ श्रीमंत प्रवाशांची सोय केली असली, तरी स्थानिक पातळीवरील सामान्यांसाठीच्या गाड्या सोडण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाचा प्रतिसाद नाही. स्थानिक लोकप्रतिनीधींचाही दबाव रेल्वे बोर्डावर नसल्याने रेल्वे प्रशासन सामान्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबत बेफिकीर आहे. 

चोवीस तासांत साठ ते बासष्ट गाड्यांची वाहतूक असलेल्या मिरज रेल्वे स्थानकात नियमितपणे केवळ दोन आणि काही साप्ताहिक गाड्या सुरू आहेत. कोयना आणि महाराष्ट्र एक्‍सप्रेस गाड्या दोन गाड्या वगळता अन्य गाड्यांचा स्थानिक प्रवाशांना काहीच उपयोग नाही. कोयना आणि महाराष्ट्र या दोन गाड्यामधून प्रवास करतानाही प्रवाशांना अनेक प्रकारचे द्रविडी प्राणायाम करावे लागत आहेत. त्यामुळे कोल्हापूर, पुणे, बेळगाव आणि सोलापूर या मार्गांवर त्वरित पॅसेंजर गाड्या सोडण्यासाठी आमदार, खासदारांसह रेल्वे प्रवासी संघटनाही आग्रही राहणार आहेत. 

दौऱ्याचे वेळापत्रक :
- सकाळी 8.30 ते 10.20 : कोल्हापूर रेल्वेस्थानक 
- सकाळी 10.50 ते 11 : जयसिंगपूर 
- सकाळी 11.35 ते 12.35 : मिरजस्थानक पाहणी 
- दुपारी 12.45 ते 2.15 : सांगलीस्थानक पाहणी 
- सायंकाळी 4.30 : सातारा स्थानक पाहणी

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The general manager will come and inspect the railway stations