फोनवर सल्ला घ्या, गर्दी टाळा 

Get advice on the phone, avoid rush
Get advice on the phone, avoid rush

सुप्रसिद्ध सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्‍चर यांनी सांगितले होते की, पृथ्वीवर सूक्ष्मजीव राज्य करतील. आज कोरोनाचे थैमान पाहिले की पाश्‍चर म्हणाले ते खरे होते. डॉक्‍टरांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांनाच हा आजार नवीन आहे. या विषाणूची ज्या व्यक्तीला लागण झाली आहे, त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना या आजाराची लागण होते. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी असे सांगितले जात आहे. ते खरेच आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणीसाठी गर्दी न करता थेट फोनवरून आपल्या डॉक्‍टरांकडून सल्ला घेणे या काळात सोयीचे ठरणार आहे. 

कोरोनाची प्रमुख लक्षणे 
ताप येणे, कोरडा खोकला, थकवा येणे, धाप लागणे किंवा श्वासोच्छवासाचा त्रास होणे. तर इतर लक्षणांमध्ये घसा दुखणे, डोके दुखणे, मळमळ किंवा उलटी होणे, पातळ संडास होणे, सांधेदुखी यासारखे प्रकार दिसून येतात. यापैकी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. 

ज्यांची प्रतिकार क्षमता कमी त्यांना धोका जास्त 
ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली आहे, अशा लोकांमध्ये कोरोनाची तीव्रता वाढण्याची व आजार गंभीर रूप घेण्याची शक्‍यता जास्त असते. विशेष करून वयोवृद्ध, डायबिटीस, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती, एचआयव्हीचे रुग्ण, कर्करोगाचे रुग्ण, प्रामुख्याने ज्यांना किमोथेरपी व रेडिएशन थेरपी चालू आहे किंवा ब्लड कॅन्सर असलेल्या व्यक्ती, हृदयविकार किंवा फुप्फुसाचे रुग्ण यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 

सर्वसाधारणपणे, लागण झालेल्या व्यक्तींमध्ये एक ते 14 दिवसांमध्ये या आजाराची लक्षणे कधीही दिसू शकतात. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनची घोषणा करून नागरिकांना जास्तीतजास्त संपर्क, गर्दी टाळण्याचे आवाहन केले. परंतु लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात लोक जेवढे गंभीर होते, तेवढे आता राहिले नाहीत. 

इमर्जन्सी नसल्यास हॉस्पिटल टाळा 
इमर्जन्सी नसेल तर हॉस्पिटलला जाणे टाळावे. काही त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्‍टरांची आधी फोनवर चर्चा करा. डॉक्‍टरांकडे जावेच लागले तर एखाद्याला बरोबर घेऊन जा. जेणे करून गर्दी टाळा. कर्करोगातून जे बरे झाले आहेत. त्यांच्या डॉक्‍टरांकडे रेग्युलर तारखा देऊन भेटी असतात. परंतु या कालावधीमध्ये फार काही त्रास नसेल तर आधी डॉक्‍टरांशी फोनवरून संपर्क साधा व त्यांच्या सल्ल्यानुसार भेट द्या. आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांना वारंवार भेटणे टाळा. 

संयम आणि सकारात्मकता यांचा योग्य मेळ घालणे महत्त्वाचे

आपण भारतीय कणखर आहोत, परंतु कोरोना विषाणूवर मात करायची असेल तर शिस्तप्रियता, संयम आणि सकारात्मकता यांचा योग्य तो मेळ घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. 

- डॉ. गौतम पुरोहित, कर्करोग तज्ज्ञ, सांगली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com