"घरोघरी देवराई'चा "युएन'कडून गौरव; जतमध्ये होणार दहा लाख फळ रोपांची लागवड 

जयसिंग कुंभार
Sunday, 20 September 2020

येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीच्या "घरोघरी देवराई' उपक्रमाचा युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोजेक्‍ट (युएनडीपी) या आंतराष्ट्रीय संस्थेने गौरव केला आहे.

सांगली : येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीच्या "घरोघरी देवराई' उपक्रमाचा युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोजेक्‍ट (युएनडीपी) या आंतराष्ट्रीय संस्थेने गौरव केला आहे. येरळाच्यावतीने 2018 पासून या उपक्रमाला सुरवात झाली असून दुष्काळी जत तालुक्‍यातील पाच हजार एकरावर दहा लाख फळ रोपांची लागवड करून ती जगवण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे. ग्रामिण भागाच्या शाश्‍वत विकासाचे उदाहरण म्हणून या उपक्रमाला "युएनडीपी'ने आपल्या संकेतस्थळावर स्थान दिले आहे. 

देवराई प्रकल्पांअंतर्गत एक एकर क्षेत्रात लागवडीसाठी दिडशे ते दोनशे फळ रोपे प्रत्येक कुटुंबाला देण्यात आली असून पुढील पाच वर्षे त्यांची देखभाल त्या कुटुंबाने करावी यासाठी प्रसंगी पाणी देण्यापर्यंतची सोय संस्थेने केली आहे. दरवर्षी एक हजार एकर क्षेत्रावर दहा लाख वृक्षांची लागवड करताना दुष्काळी भागातील पाच हजार कुटुंबे फळलागवडीने समृध्द होतील. गेल्या तीन वर्षात सुमारे अडीच हजार क्षेत्रावर आत्तापर्यंत लागवड पुर्ण झाली आहे. ही सर्व रोपे जगवण्यात त्या कुटुंबाना यश आले आहे.

या प्रकल्पाची जून 2019 मध्ये "युएनडीपी'चे भारताचे प्रतिनिधी प्रबज्योतसिंह सोदी यांनी पाहणी केली होती. त्यांनी या प्रकल्पाची आंतराष्ट्रीय स्तरावर शिफारस केली होती. त्यानंतर नुकतेच "युएनडीपी'ने येरळा संस्थेला पाठवलेल्या पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. स्थानिक पातळीवर पर्यावरण पूरक शाश्वत विकासाच्या संकल्पना राबवण्यासाठी आदर्श उदाहरण म्हणून या प्रकल्पाची माहिती संकेतस्थळावर ठेवण्यात आली असून आंतराष्ट्रीय नकाशावर हरित स्थानही दिले आहे. 

पाऊलवाट घालून देणारा प्रकल्प

"घरोघरी देवराई' या प्रकल्पाला मिळालेला हा गौरव उत्साह वाढवणारा असून दुष्काळी तालुक्‍यातील वृक्षारोपणाची दिशा काय असावी याचे पाऊलवाट घालून देणारा हा प्रकल्प ठरेल.' 

- एन.व्ही.देशपांडे, सचिव, येरळा प्रोजेक्‍ट सोसायटी 

संपादक : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Gharoghari Devarai's project felicitated Glory from "UN"; One million fruit seedlings will be planted in Jat