घेवड्यास अधिक दर, कर्ज अन्‌ बक्षीसही!

पांडुरंग बर्गे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

कोरेगाव - यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित घेवड्यासह इतर कडधान्यांना कोरेगावसह वाठार स्टेशन व रहिमतपूर येथे खुल्या लिलाव प्रक्रियेद्वारे उंच दर, रोख पेमेंट, तारण कर्ज, बक्षीस अन्‌ अनुदानही मिळणार आहे. यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांना सुखकर जाईल, अशी चिन्हे आता तरी दिसू लागली आहेत. 

कोरेगाव - यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित घेवड्यासह इतर कडधान्यांना कोरेगावसह वाठार स्टेशन व रहिमतपूर येथे खुल्या लिलाव प्रक्रियेद्वारे उंच दर, रोख पेमेंट, तारण कर्ज, बक्षीस अन्‌ अनुदानही मिळणार आहे. यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांना सुखकर जाईल, अशी चिन्हे आता तरी दिसू लागली आहेत. 

कोरेगाव तालुका शेती उत्पन्न बाजार समिती व तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाने चालू खरीप हंगामात घेवड्यासह इतर कडधान्यांचा कोरेगाव मुख्य बाजार आवारासह वाठार स्टेशन व रहिमतपूर या उपबाजार आवारात खुली लिलाव प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आवारात आवक झालेल्या शेतीमालाचे रोजच्या रोज खुले लिलाव करून जागेवरच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. त्यात शेतकऱ्यांच्या उत्तम प्रतीच्या मालास उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे, तसेच शेतमाल उंच दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांनी बाजार आवारात आणलेल्या घेवड्यास महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून बाजारभावाच्या ७५ टक्के तारण कर्ज सहा महिने मुदतीसाठी सहा टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. सहा महिने मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात तीन टक्के रिबेट देण्यात येणार आहे. त्यामध्ये गोदाम भाडे खर्च हा बाजार समिती करणार आहे. त्याबरोबर बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना वाहतूक खर्चास अनुदानही देणार आहे. पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी उत्तम प्रतीच्या बियाण्यांची नोंदणी करून पुरवठाही करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना सात- बारा, खातेउतारा, आधारकार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्‍स प्रत आवश्‍यक आहे.

शेतीमाल स्वच्छ, निवड करून आणा
दरम्यान, शेतकऱ्यांनी आपला घेवड्यासह इतर माल स्वच्छ, निवड करून व वाळवून बाजारात आणून विक्री करताना उंच दर, उत्तेजनार्थ बक्षीस, अनुदान आदी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कोरेगाव बाजार समितीचे सभापती प्रतापराव कुमुकले, सचिव संताजी यादव, तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष शहाजीराव भोईटे, व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ghevada rate loan gift