आवक वाढल्याने आले घसरले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

काशीळ - गेल्या चार वर्षांच्या कालावधीनंतर आले पिकाच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरू लागली आहे. आले पिकाचा प्रतिगाडी (500 किलो) 30 ते 32 हजार रुपये असणारा दर आता 20 ते 22 हजार रुपये प्रतिगाडी असा घसरल्यामुळे आले उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. आल्याची आवक वाढल्यामुळे दरात ही घसरण झाली आहे. 

काशीळ - गेल्या चार वर्षांच्या कालावधीनंतर आले पिकाच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरू लागली आहे. आले पिकाचा प्रतिगाडी (500 किलो) 30 ते 32 हजार रुपये असणारा दर आता 20 ते 22 हजार रुपये प्रतिगाडी असा घसरल्यामुळे आले उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. आल्याची आवक वाढल्यामुळे दरात ही घसरण झाली आहे. 

साताऱ्यासह औरंगाबाद जिल्ह्यात आल्याचे मोठे क्षेत्र आहे. सातारा जिल्ह्यात आल्याचे सर्वसाधारण क्षेत्र 2200 ते 2500 हेक्‍टर आहे. मागील चार वर्षांपूर्वी प्रतिगाडी 50 ते 55 हजार रुपये असलेला दर सात ते आठ हजार रुपयापर्यंत खाली आल्याने जिल्ह्यासह राज्यातील आल्याच्या क्षेत्रात घट झाली. मात्र, या हंगामातील एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून आल्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरवात झाली. या काळात आल्याचे दर प्रतिगाडीस 25 ते 28 हजारापर्यंत पोचले होते. मात्र, अजून दर वाढण्याच्या शक्‍यतेच्या आशेमुळे शेतकऱ्यांनी आले काढणी केली नाही. त्यामुळे अगदी थोड्या कालावधीसाठी व्यापाऱ्यांनी प्रतिगाडीस 30 ते 32 हजारपर्यंत दर चढवला 

होता. दर वाढल्याने शेतकरी बाजारपेठेत आले देऊ लागले. बाजारपेठांत आल्याच्या आवकेत जसजशी वाढ होत गेली तसतसा दरावर परिणाम झाला. 

दरम्यान, कर्नाटकातून बंगळूर व बेळगाव येथून आले बाजारपेठेत दाखल होऊ लागले आहे. दिवसेंदिवस येथून आल्याची मोठी आवक होत असल्याने दरातील घसरण सुरू झाली आहे. सध्या आल्यास प्रतिगाडीस 20 ते 22 हजार रुपये दर मिळतो. दर अजून कमी होतील, या भीतीने शेतकरी आले काढणी वेगात करू लागले आहेत. या घसरणीमुळे प्रतिगाडीमागे दहा ते 12 हजार रुपये कमी घ्यावे लागत आहेत. आले ठेवावे की काढून विक्री करावी, याबाबत शेतकऱ्यांच्या मनात द्विधा मनस्थिती आहे. आल्याच्या प्रतिगाडीस 15 ते 16 हजार रुपयांपर्यंत दर स्थिर होण्याचा अंदाज व्यक्त होत असला, तरी आल्याच्या दराबाबत ठाम सांगता येत नसल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. दर वाढल्यामुळे जिल्ह्यात आले पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता कमी झाली आहे. पाणीटंचाई, तसेच आले पिकाच्या दरातील अशाश्वतता यामुळे सध्या आले काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आल्याची आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांकडून दर पाडले जात असल्याने सध्या दर कमी झाला आहे. मात्र, ऑगस्टमध्ये आल्याची आवक कमी होत असल्याने या महिन्यात दर वधारण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

""व्यापाऱ्यांनी थोड्या कालावधीसाठी आल्याला प्रतिगाडीस 30 ते 32 हजारांवर दर दिले. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आले काढणी केल्याने बाजारात आल्याची आवक वाढली. त्यामुळे दर कमी झाले आहेत. मात्र, ऑगस्ट महिन्यात दराची परिस्थिती बदलेल.'' 
- तुळशीराम फडतरे, आले उत्पादक शेतकरी, फडतरेवाडी. 

""आल्याच्या दरात सुधारणा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर आले काढणीवर भर दिला आहे. परिणामी बाजार समितीत आल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम दराच्या घसरणीत होऊ लागलेला आहे.'' 
- एच. ए. मोरे, निरीक्षक, सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती. 

Web Title: ginger rate price less