ही एक्‍सप्रेस ७० दिवसानंतर प्रथमच मिरजेतून धावली

शंकर भोसले
Wednesday, 3 June 2020

भारतीय रेल्वेकडून एक जून पासून सुरू केलेल्या रेल्वे गाड्यांतील मिरजेतून पहिली गोवा निजामुद्दीन एक्‍सप्रेस धावली.

मिरज ः भारतीय रेल्वेकडून एक जून पासून सुरू केलेल्या रेल्वे गाड्यांतील मिरजेतून पहिली गोवा निजामुद्दीन एक्‍सप्रेस धावली. गोवा येथील वास्कोदगामा स्थानकातून निघालेली गाडी मडगाव, कॉपसरलॉक, लोंढा बेळगाव मार्गे मिरज स्थानकात रात्री दहानंतर पोहोचली.

गोवा एक्‍सप्रेसमधून उतरलेल्या प्रवाशांचे थर्मल स्क्रॉनिग करून त्यांची आरोग्य तपासणी करूनच त्यांना घरी सोडण्यात आले. कर्नाटक, गोवा राज्यातून आलेल्या या 52 प्रवाशांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची माहिती ही स्थानिक आरोग्य यंत्रणेला देण्यात आली. निजामुद्दीन एक्‍सप्रेसमधून मिरज आणि सांगली स्थानकातून 116 प्रवासी रवाना झाले. त्यांची देखील रेल्वे स्थानकात आरोग्य तपासणी करण्यात आली. 

आज तब्बल सत्तर दिवसांच्या विश्रांतीनंतर प्रथमच मिरज स्थानकातून प्रवासी रेल्वे धावल्यामुळे गेली अनेक दिवस शुकशूकाट असलेल्या मिरज स्थानक तुरळक प्रवाशांमुळे फुलले. मात्र हे सर्व प्रवाशी परराज्यातील असल्यामुळे एरवी हजारोंच्या संख्येने प्रवासी वाहतुक करणा-या मिरज सांगली स्थानकातून आज फक्त 116 प्रवासी रवाना झाले. 

मिरज, सांगली स्थानकातून रवाना झालेल्या प्रवाशांना मात्र आपण आरक्षित केलेल्या स्थानकांशिवाय इतर कुठल्याच स्थानकावर उतरता येणार नाही. 

चौकशी केंद्रावरही शारिरीक अंतराचा नियम 

मिरज स्थानकावरील चौकशी खडकीदेखील सुरू झाली. त्यामुळे या ठिकाणी कार्यरत असलेल्या आरक्षण पर्यवेक्षिका शुभांगी सावंत यांनीदेखील चौकशी खिडकीबाहेर प्रवाशांना शारिरीक अंतर ठेऊन उभे रहाण्याच्या नियमाचे तंतोतंत पालन करायला लावून प्रवाशांना मिरज येथून धावणा-या गाड्यांची माहिती दिली. गाडीतून प्रवास करतानादेखील सुरक्षित अंतर ठेऊन प्रवास करण्याच्या सुचना चौकशी खिडकीवर दिल्या जात होत्या. 

रद्द तिकीटांचा परतावा तीन लाख 

रेल्वेने राज्याअंतर्गत प्रवासाची बंदी असल्यामुळे ज्या प्रवाशांनी 22 मार्च ते 30 जून अखेर तिकीटे आरक्षित केली होती. अशा प्रवाशांना मिरज रेल्वे स्थानकातून तिकीटे रद्द करून नियमित तीन लाख रूपयांचा परताना दिला जात असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी रेल्वेने ठरवून दिलेल्या तारखेला मिरज स्थानकात येऊन तिकीटांचे पैसे घेऊन जाण्याचे आवाहन मिरज रेल्वे अधिकारी संजीतकुमार झा यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goa Nizamuddin Express ran through Miraj first time after 70 days