जेव्हा पेटीत सापडतात सोने-चांदीचे नाणी...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 October 2019

जमिनीमध्ये पेटी मिळाली असून, त्यात सोने-चांदीचे शिक्के आहेत, असे सांगून ब्युटीपार्लर चालविणाऱ्या पती-पत्नीला गंडविले.

सोलापूर : जमिनीमध्ये पेटी मिळाली असून, त्यात सोने-चांदीचे नाणी आहेत, असे सांगून ब्युटीपार्लर चालविणाऱ्या पती-पत्नीला गंडविले. पिवळ्या धातूचे शिक्के सोन्याचे नाणी म्हणून देऊन सहा लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

बसवराज मल्लेशअप्पा आवटे (वय 48, रा. केदारनाथ रेसिडेन्सी, पहिला मजला, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. शंकर (वय 28), त्याची बहीण आणि रमेश नावाचा मामा या तिघांची आवटे पती-पत्नीची फसवणूक केली. ही घटना 28 सप्टेंबर ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत घडली आहे. संशयित आरोपी आवटे यांच्या नवी पेठेतील दुकानांमध्ये आले होते. त्यांनी आम्हाला जमिनीमध्ये पेटी मिळाली आहे. त्यामध्ये सोने व चांदीचे शिक्के आहेत, असे सांगितले. मल्लिकार्जुन नगर येथील बस स्टॉप जवळ बोलावून घेतले.

तसेच सात रस्ता परिसरात बोलावून शिक्‍क्‍यांचा व्यवहार पंधरा लाख रुपयांना ठरविला. दोन सोन्याचे खरे शिक्के दिले, आवटे यांनी सोनाराकडून तपासून घेतले. त्यानंतर सहा लाख रुपये घेऊन कापडी पिशवीमध्ये एक हजार ते दीड हजार पिवळ्या धातूचे खोटे शिक्के देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक विष्णू गायकवाड तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold and silver coins are found in the box