सावकाराच्या पेढीतून 15 लाखांचे सोने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मिरज: शहरातील तंतुवाद्य व्यावसायिक संजय मिरजकर यांना 50 लाखांचे कर्ज देऊन दोन कोटींची वसुली करणाऱ्या खासगी सावकार संतोष कोळीच्या सराफी पेढीतून आज पोलिसांनी 15 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. हे दागिने त्याने गहाणवट स्वरूपात घेतल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. 

मिरज: शहरातील तंतुवाद्य व्यावसायिक संजय मिरजकर यांना 50 लाखांचे कर्ज देऊन दोन कोटींची वसुली करणाऱ्या खासगी सावकार संतोष कोळीच्या सराफी पेढीतून आज पोलिसांनी 15 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. हे दागिने त्याने गहाणवट स्वरूपात घेतल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. 

भरमसाट व्याजाने कर्जाची वसुली करण्यासाठी मिरजकर यांची छळवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील 8 खासगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात विजय पाटगावकर या खासगी सावकारास यापूर्वीच अटक केली होती. त्याची जामिनावर मुक्तता झाली. परंतु अन्य सात सावकार फरारी होते. या सर्वांच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणून त्यांना न्यायालयातून फरारी घोषित करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी सुरेश दादासाहेब लांडगे या खासगी सावकाराने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. यापैकी संतोष कोळी आणि सचिन गायकवाड यांना पोलिसांनी मंगळवारी (ता. 25) पहाटे तीन वाजता अटक केली. त्यांना न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सध्या पोलिस कोठडीत या दोघांची चौकशी सुरू असतानाच संतोष कोळी यांच्या घराची आज पोलिसांनी झडती घेतली. तेथे काहीच आक्षेपार्ह मिळाले नाही. खासगी सावकारीतील कोणतीही कागदपत्रे अथवा पुरावे घरांत मिळाले नसल्याने पोलिसांनी कोळीच्या सराफी पेढीकडे मोर्चा वळवला. सायंकाळी सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

या दरम्यान 15 लाख रुपयांहून अधिक रकमेचे सोने पोलिसांनी जप्त केले. हे सर्व सोने संतोष कोळीने गहाणवट स्वरूपात घेतल्याचे पेढीतील उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे सोन्याचे दागिने, कागदपत्रे पाहून पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. उपाधीक्षक संदीपसिंह गिल, पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यासह पंधराहून अधिक पोलिस कर्मचारी सराफी पेढीच्या झाडाझडतीचे काम रात्री उशिरापर्यंत करीत होते. कोळीच्या सराफी पेढीत मिळालेल्या दागिन्यांची तपासणी करण्यासह या दागिन्यांशी संबंधित असलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठीही पोलिसांनी तज्ज्ञांची मदत घेतली आहे. 

पोलिसांच्या कारवाईत पंच म्हणूनही पोलिसांनी विविध विभागांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावले होते. त्यांच्या समक्ष सर्व दागिन्यांचा पंचनामा केला. ते ताब्यात घेतले आहे. सर्व कारवाईचे पोलिसांनी चित्रीकरणही केले आहे. 

आता मोर्चा अन्य सावकारांकडे 
कोळीच्या सराफी पेढीवरील कारवाईनंतर आता सचिन गायकवाड या अटक केलेल्या खासगी सावकाराच्या घराच्या झडतीसह अन्य स्थावर मालमत्तांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. खासगी सावकारांविरुद्धच्या पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे याच गुन्ह्यातील अन्य खासगी सावकारही शरण येण्याच्या स्थितीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold worth Rs 15 lakh seized from moneylenders