बाबा, तुमचा दरबार सोन्याचा! 

बाबा, तुमचा दरबार सोन्याचा! 

शिर्डी : सव्वाचारशे किलोहून अधिक सोन्याचे धनी असलेल्या साईबाबांच्या समाधी मंदिरात आज सुवर्णजडित शंख दाखल झाला. सुवर्ण झळाळीने तळपणाऱ्या साईमंदिरात आता नव्या वर्षात नित्याचा शंखध्वनी या सुवर्णजडित शंखाने होईल. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्ली येथील साईभक्त रक्षा शर्मा यांनी ही अनोखी भेट साईचरणी अर्पण केली. या शंखावर सोन्याच्या वेलबुट्टीचे सुबक नक्षीकाम केलेले आहे. 

साईबाबांच्या नैवेद्याचा पाट, ताट, वाट्या, तांब्या आणि फुलपात्र, तसेच नित्य पूजेची पंचारती, निरंजन, घंटी आणि समयादेखील सोन्याच्या आहेत. साईंचे सिंहासन शंभर किलो वजनाच्या सोन्याच्या नक्षीदार पत्र्याने मढविण्यात आले आहे. "श्रीं'च्या मूर्तीवरील छत्री सोन्याची आणि साईमंदिराच्या भिंतीदेखील आतील बाजूने सोन्याचा लेप दिलेल्या पत्र्याने सजविण्यात आल्या आहेत. त्यावर सुबक नक्षीकाम व पौराणिक प्रसंगांची मोहक चित्रे साकारलेली आहेत. साईमंदिरात प्रवेश करताच बाबांच्या या सुवर्ण झळाळीने डोळे दिपून जातात. साईमंदिराच्या कळसालाही सुवर्णलेप देण्यात आला आहे. एका भाविकाने संपूर्ण साईमंदिराला सुवर्णलेप देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

बाबांच्या झोळीत चारशे चाळीस किलो सोने व सुमारे पाच हजार किलो चांदी जमा झाली आहे. चार घरी भिक्षा मागून फकिरासारखे जीवन जगलेल्या साईबाबांचा दरबार सोन्याने सजविण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ सुरू आहे. भाविकांकडून "श्रीं'च्या मूर्तीसाठी रत्नजडित सुवर्णमुकूट सातत्याने दान दिले जातात. सोन्याने मढविलेल्या रुद्राक्षमाळा, लफ्फेदार सुवर्णहार आणि सोन्याच्या विविध वस्तू बाबांना भेट दिल्या जातात. 

बाबांच्या वैभवाचे प्रतीक 
साईमंदिरातील सकाळच्या "शिर्डी माझे पंढरपूर' या छोट्या आरतीनंतर शंखध्वनी केला जातो. त्यासाठी आता सुवर्णजडित शंख वापरला जाईल. मंदिरातील हा सोन्याचा थाटमाट बाबांच्या वैभवाचे प्रतीक आहे. बरेच भाविक सुवर्णदान देताना नावदेखील जाहीर करीत नाहीत. "बाबांच्या कृपेने मिळाले, बाबांना दिले,' हा भाव त्यामागे असतो. 
- शांताराम मिराणे, माजी विश्‍वस्त, साई संस्थान  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com