डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीचा साऱ्यांनाच विसर

धोंडिराम पाटील
शनिवार, 20 एप्रिल 2019

सांगली - लोकसंस्कृती व साहित्याच्या अभ्यासक, संशोधक, संकलक डॉ. सरोजिनी बाबर ऊर्फ आक्का यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेय. त्यालाही तीन महिने झालेत. मात्र साहित्य क्षेत्रासह शासनालाही आठवण नाही. इतकं मोठं करुनही ‘ना चिरा, ना पणती’ अशीच अवस्था आहे. 

सांगली - लोकसंस्कृती व साहित्याच्या अभ्यासक, संशोधक, संकलक डॉ. सरोजिनी बाबर ऊर्फ आक्का यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेय. त्यालाही तीन महिने झालेत. मात्र साहित्य क्षेत्रासह शासनालाही आठवण नाही. इतकं मोठं करुनही ‘ना चिरा, ना पणती’ अशीच अवस्था आहे. 

डॉ. बाबर यांनी लोकसंस्कृती, लोकसाहित्याचा अभ्यास, संशोधन, संपादन, संकलन करून लोककला, साहित्याचा मोठा ठेवा महाराष्ट्राला उपलब्ध करून दिला.  लोकसाहित्य समितीच्या अध्यक्ष म्हणून मोठे काम केले. वडील कृष्णराव बाबर यांनी सुरू केलेल्या समाज शिक्षण मालेचे कामही त्यांनी निष्ठेने केले. कथा, कादंबरी,  काव्य, ललित असेही विविधांगी लेखन केले. 

बागणी (ता. वाळवा) ही जन्मभूमी. ७ जानेवारी १९२० रोजी जन्म. २० एप्रिल २००८ रोजी मृत्यू. त्या उच्चविद्याविभूषित होत्या. १९५२ ते ५७ त्या  विधानसभा, १९६४ ते ६६ विधान परिषद व १९६८ ते १९७४ राज्यसभा सदस्य होत्या. चिं. ग. कर्वे अध्यक्ष असताना त्या लोकसाहित्य समितीत त्या सदस्या होत्या. नंतर अध्यक्ष झाल्या. लोकसाहित्य, लोकसंस्कृतीच्या अभ्यासासाठी त्यांनी महाराष्ट्र पालथा घातला. भटकंती करून ओव्या, गीते, लोककथा, कहाण्या, म्हणी, वाक्‍प्रचार, कोडी, खेळगाणी, उखाणे यांचे संकलन केले. 

कृष्णराव बाबर त्यांचे वडील. ‘शिकता येईल ते जन्मभर शिकावं. इतरांनाही शिकवून मोकळं व्हावं’ हा विचार ते जगले. शिक्षक म्हणून निवृत्त झाले. समाज शिक्षणाला वाहून घेतले. ‘समाज शिक्षणमाला’ सुरू केली. ५० वर्षे दरमहा एक पुस्तक अशी शिक्षणमाला सुरू होती. त्यांच्या पश्‍चात डॉ. बाबर यांनी व्रत निभावले. सरोजिनी, कुमुदिनी, शरदिनी या भगिनी. एक भाऊ जवाहर. तो अकाली गेला. ‘मुलाची उणीव भासू देणार नाही’ असे वचन त्यांनी आईला दिले. अखेरपर्यंत निभावलेही.  तिघीही संपादक, प्रकाशक, वितरक, व्यवस्थापक, प्रशासक, शिपाई अशा जबाबदाऱ्या पार पाडत. पाचशेवर पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.

‘ना निधी, ना पुढाकार’
 डॉ. बाबर यांचं जन्मगाव व आजोळही बागणी. त्यांची जन्मशताब्दी सुरू झालीय, पण निधी कोण देणार?  पुढाकार कोण घेणार? या प्रश्नात सारे अडकलेत.

डॉ. बाबर यांची काही पुस्तके
‘जा माझ्या माहेरा’, ‘दसरा-दिवाळी’,‘श्रावण-भाद्रपद’, ‘कुलदैवत’, ‘लोकसाहित्याचा सामवेद’, ‘बाळराजा’, ‘जा माझ्या माहेरा’, ‘कुलदैवत’,‘कारागिरी’, ‘भाषा आणि संस्कृती’,‘भारतीय स्त्री रत्ने’,‘आदिवासींचे सणोत्सव’, ‘लोकसाहित्यांचा शब्दकोश’, ‘तीर्थाचे सागर’ (संपादित).  

रानजाई मालिकेचं काम सुरू होतं तेव्हा बागणीत जाणं-येणं होतं. जिल्ह्यानं जन्मशताब्दी करायलाच हवी. सूरत येथे हायस्कूलला त्यांचं नाव दिलंय. आक्कांच्या स्मृती जतन व्हाव्यात.
- कुमुदिनी पवार,  
(डॉ. सरोजिनी बाबरांची बहीण)

गावोगावच्या मायमाऊल्यांना बोलतं करून त्यांनी लोकधन उजेडात आणलं. लोकसाहित्य समितीने बरंच प्रसिद्ध केलंय. ते शासनाने पुन्हा प्रकाशित करणं हेच अभिवादन ठरेल. 
- संजय पाटील,
निवृत्त अधिकारी (आकाशवाणी)

Web Title: Government forget Dr. Sarojini Babar birth centenary year