चौघांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

घटनाक्रम
१५ नोव्हेंबर - अमोल काळे अटक
एक डिसेंबर - वासुदेव सूर्यवंशी, भरत कुरणे अटक
१४ जानेवारी - अमित डेगवेकर अटक
११ फेब्रुवारी- पुरवणी आरोपपत्र दाखल

कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अमोल काळेसह चौघांविरोधातील पुरवणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सादर केले. ते ३०० पानांचे आहे. गुन्ह्यातील याआधीच्या संशयितांशी चौघांचे असलेले संबंध, त्यांचे कॉल डिटेल्स यासंदर्भातील पुरावे त्यात आहेत. त्याशिवाय ८५ जणांच्या साक्षी आहेत. यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे उपस्थित होते. 

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने आठ संशयितांची निश्‍चिती केली आहे. यांतील समीर विष्णू गायकवाड व डॉ. वीरेंद्र शरदचंद्र तावडेविरोधात या आधी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. यातील विनय पवार व सारंग आकोळकर फरारी आहेत. गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीने ताब्यात घेतलेल्या अमोल अरविंद काळे (वय ३४, रा. पिंपरी चिंचवड, जि. पुणे) याला नोव्हेंबर २०१८ मध्ये कोल्हापूर एसआयटीने ताब्यात घेतले. या नंतर वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. यावली, जि. जळगाव), भारत ऊर्फ भरत जयवंत कुरणे (३७, रा. महाद्वार रोड, बेळगाव) आणि अमित रामचंद्र डेगवेकर (३८, रा. कळणे, दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. 

संशयितांचे जवाब, आधीच्या चार संशयितांशी असलेल्या संबंधांचे पुरावे, सर्व संशयितांनी एकमेकांना पाठवलेले ई-मेल्स, मोबाइल कॉल डिटेल्ससह ८५ साक्षीदारांच्या साक्षींचा समावेश आरोपपत्रात आहे. डॉ. तावडे प्रमुख सूत्रधार असल्याचे याआधीच्या आरोपपत्रात म्हटले आहे. त्याला मदत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अवैध शस्त्र बाळगणे, विनापरवाना शस्त्रांचा वापर करणे, संगनमताने गुन्हा करणे असे आरोप संशयितांवर ठेवण्यात आले आहेत.

घटनाक्रम
१५ नोव्हेंबर - अमोल काळे अटक
एक डिसेंबर - वासुदेव सूर्यवंशी, भरत कुरणे अटक
१४ जानेवारी - अमित डेगवेकर अटक
११ फेब्रुवारी- पुरवणी आरोपपत्र दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govind Pansare murder case follow up