पानसरे हत्या प्रकरण : कोल्हापुरातील लेखकासह दोन विचारवंतांची रेकी

पानसरे हत्या प्रकरण : कोल्हापुरातील लेखकासह दोन विचारवंतांची रेकी

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येपूर्वी संशयित वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरेसह पाच जणांची कोल्हापुरात एका खोलीत बैठक झाली. त्यात शहरातील लेखकासह दोन विचारवंतांची रेकी करण्याबाबत चर्चा झाली, अशी माहिती पुढे आल्याचा दावा विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. माळी यांनी दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दी व गणेश मिस्किन यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पानसरे हत्येप्रकरणी आज सकाळी बाराच्या सुमारास संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन यांना अटक केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. माळी यांच्या न्यायालयात हजर केले. सरकार पक्षातर्फे ॲड. शिवाजीराव राणे यांनी युक्तिवाद केला. पानसरे यांच्या हत्येपूर्वी संशयित वीरेंद्र तावडेच्या सांगण्यावरून संशयित वंदुरे हा कोल्हापुरात आला होता. त्याच्यासह तावडे व अन्य संशयितांची शहरातील खोलीत बैठक झाली. तीत शहरातील एक लेखक व इतर दोन विचारवंतांची रेकी करण्याबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती पुढे आली आहे. बैठकीस असणारे तिघे अन्य संशयित कोण होते? बैठकीत नेमकी कोणाच्या रेकीबाबत चर्चा झाली. त्यानुसार कोणी कोणाची व केव्हा रेकी केली? याबाबतचा तपास संशयित अंदुरेकडे करावयाचा आहे.

पानसरे हत्येपूर्वी या प्रकरणातील संशयित अमोल काळेने अंदुरेला अंबाबाई मंदिरात बोलवले होते. त्यानुसार अंदुरे औरंगाबादवरून आला होता. ते दोघे मंदिर व आसपासच्या परिसरात थांबले होते, अशी माहिती पुढे आली आहे. मंदिर परिसरातच पानसरे यांचे कार्यालय आहे. त्याअनुषंगाने काळे व अंदुरे कोठे कोठे थांबले होते? दोघांनी रेकी केली आहे का? याचाही तपास करावयाचा आहे. गुन्ह्याच्या अगोदर हुबळी (कर्नाटक) येथे संशयित अंदुरे, बद्दी, मिस्किन, वासुदेव सूर्यवंशी यांनी फायरिंगचा सराव केला होता. त्यासाठी अंदुरेने सात राऊंड आणले होते. तेथे मिस्किनच्या पिस्तुलातून सूर्यवंशीने एक राऊंड फायर केला होता, अशी माहिती पुढे आली आहे.

त्याअनुषंगाने अंदुरेने सात राऊंड कोठून आणले, सरावानंतर किती राऊंड शिल्लक राहिले, ते कोठे आहेत? तसेच मिस्किनकडे पिस्तूल कोठून आली? त्याचा कोठे कोठे वापर केला? याची माहिती तपास यंत्रणेला घ्यावयाची आहे.
यापूर्वी अटक केलेला संशयित वासुदेव सूर्यवंशीसोबत संशयित बद्दी व मिस्किन मोटारसायकल चोरीत सहभागी होते, अशी माहिती पुढे आली आहे. तसेच बद्दीचे कोल्हापुरात वारंवार येणे-जाणे होते. तो शहरात कशासाठी येत होता? कोणाला भेटत होता? त्याने पानसरे यांची रेकी केली आहे का? याबाबतचा तपास करावयाचा आहे, असा युक्तिवाद ॲड. राणे यांनी केला. गणेशोत्सव सुरू असल्याने तपासासाठी १५ दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली.

संशयितांतर्फे ॲड. समीर पटवर्धन यांनी बाजू मांडली. त्यात तपास यंत्रणेने यापूर्वी अटक संशयित समीर गायकवाड व डॉ. तावडेला अटक केली. यात समीरच शुटर दाखवला. ओळख परेडमध्ये त्याला एका साक्षीदाराने ओळखले. त्यानंतर तावडेने कट रचला आणि पसार असलेले संशयित सारंग अकोळकर व विनय पवार हे शुटर दाखवले. त्या दोघांनाही साक्षीदारांनी ओळखले.

अकोळकर व पवारसाठी शासनाने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले. मोटारसायकलच्या तपासासाठी सूर्यवंशीला अटक केली. पुन्हा हेच कारण दाखविण्यात आले आहे. पोलिसांनी कस्टडी मागितली म्हणून द्यावी असे नाही तर त्यासाठी 
ठोस कारण असावे लागते, असे सांगून तपास यंत्रणेवरच आक्षेप नोंदवत तिघा संशयितांना पोलिस कस्टडी देऊ नये, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश माळी यांनी अंदुरे, बद्दी आणि मिस्किन या तिघांना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

संशयितांना न्यायालयात हजर करताना पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, सुनील पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, किरण भोसले, यांच्यासह पोलिस निरीक्षक रमेश ढाणे, उपनिरीक्षक किशोर डोंगरे यांच्यासह फौजफाटा उपस्थित होता. मेघा पानसरे व दिलीप पवार हेही न्यायालयात उपस्थित होते.

अपर पोलिस अधीक्षक काकडेंवर आक्षेप
संशयित सचिन अंदुरेने सीबीआयच्या ताब्यात असताना तपास अधिकारी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी पहाटे तीनपर्यंत चौकशी करून मानसिक त्रास दिला. याबाबत राष्ट्रीय मानवाधिकारांकडे तक्रार केल्याचे अंदुरेने न्यायालयासमोर सांगितले असल्याचे त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली असून, असा प्रकार घडला नसल्याचे पुढे आले आहे. याबाबतचा अहवालही सीबीआयकडून लवकरच सादर केला जाईल, असे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सांगितले.

दुभाषकाची मदत
अटक केलेले हुबळीतील संशयित अमित बद्दी व गणेश मिस्किन यांना मराठी येत नाही. त्यांना कन्नडच येत असल्याने चौकशीत पोलिस यंत्रणेला द्विभाषिकाची मदत घ्यावी लागणार आहे.

वकिलांना भेटण्याची मुभा
तिघा संशयितांना पोलिस कोठडी दरम्यान भेटता यावे, अशी मागणी ॲड. समीर पटवर्धन यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार त्यांना दररोज सायंकाळी साडेपाच ते सहा वेळेत भेटण्याची मुभा न्यायालयाने त्यांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com