पदवीधर मतदारसंघ वार्तापत्र : अरुण लाड यांची भिस्त जयंतरावांवरच; सारंग पाटील यांच्या माघारीमुळे राष्ट्रवादीत चुरस

जयसिंग कुंभार
Monday, 19 October 2020

राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी जोरदार लढत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीसाठी उमेदवारी घेऊन अरुण लाड यांना संधी देणार का, याकडे आता राष्ट्रवादीच्या वर्तुळात लक्ष लागले आहे. 

सांगली ः पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून गतवेळच्या निवडणुकीतील विजेते आणि प्रमुख पराभूत असे दोन्ही उमेदवार यावेळी रिंगणात नसतील. महाआघाडीच्या जागा वाटपात ही जागा अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी जोरदार लढत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीसाठी उमेदवारी घेऊन अरुण लाड यांना संधी देणार का, याकडे आता राष्ट्रवादीच्या वर्तुळात लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादीच्या वर्चस्व काळातही भाजपने हा मतदारसंघ जिंकून पदवीधर निवडणुकीतील नेटवर्किंगचा प्रत्यय आणून दिला होता. त्यामुळेच यावेळी राष्ट्रवादीने हा मतदारसंघ खेचायचाच या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादीचा यावेळचा उमेदवार महाआघाडीचा असू शकेल. कॉंग्रेस-शिवसेनेची या उमेदवाराला मिळणारी मदत बेरजेची ठरेल. 

राष्ट्रवादीकडून गतवेळी लढलेले सारंग पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच लढणार नसल्याचे जाहीर केल्याने गतवेळी त्यांच्यापाठोपाठ मते घेतलेले राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड यांच्यासाठी उमेदवारी मिळवण्याचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीकडून नीता ढमाले, उमेश पाटील, बाळराजे पाटील, श्रीमंत कोकाटे, प्रताप माने, मनोज गायकवाड, भरत रसाळे अशी अन्य मंडळीही चर्चेत आहेत. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची दबक्‍या आवाजात चर्चा होती.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या उमेदवारीसाठीही सांगलीतून पत्रकबाजी झाली होती; मात्र या साऱ्या चर्चांना बहर येण्याआधीच त्या संपल्या. 
ही निवडणूक लढायचीच या इराद्याने गेल्या काही वर्षांपासून अरुण लाड यांचे प्रयत्न सुरू आहेत. गतवेळी त्यांनी बंडखोरी केली होती; मात्र राज्यातील कॉंग्रेस आघाडीची सत्ता गेल्यानंतरही लाड यांनी पुन्हा राष्ट्रवादीतच निष्ठा दाखवली होती.

श्री. लाड यांनी गेल्या काही वर्षांत त्यांचे पलूस-कडेगाव मतदारसंघातील पारंपरिक विरोधक आणि राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्यासोबतही विधानसभा निवडणुकीपासून जुळवून घेतले आहे. गेली दोन वर्षे त्यांच्याकडून मतदार नोंदणी सुरू आहे. आर. आर. पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आता जिल्ह्यात जयंतरावांकडे आहे. त्यामुळे त्यांनी स्वजिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी जातीने लक्ष घातले आहे. लाड यांच्या रुपाने ते जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळवून देण्यासाठी पक्षात आपले वजन वापरतात का, हे लवकरच स्पष्ट होईल.  

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graduate Constituency Newsletter: Arun Lad depends on Jayant Patil