पदवीधर मतदारसंघ वार्तापत्र : निष्ठावान की, आयात; भाजपसमोरचा पेच 

जयसिंग कुंभार
Tuesday, 20 October 2020

भाजपसाठी हक्काचा आणि आता प्रतिष्ठेचाही असलेल्या पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून यावेळी उमेदवार निवडीचे मोठे आव्हान असेल.

सांगली : भाजपसाठी हक्काचा आणि आता प्रतिष्ठेचाही असलेल्या पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून यावेळी उमेदवार निवडीचे मोठे आव्हान असेल. विद्यमान आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वारसदार शोधावा लागणार आहे. त्याचवेळी इच्छुकांची भाऊगर्दी आणि निष्ठावान की, आयात असाही पेच भाजपच्या शीर्षनेतृत्वासमोर असेल.  सोबतीला मतदारसंघात तयार झालेला टोकदार जात फॅक्‍टरही असेल. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील 58 विधानसभा आणि साडेनऊ लोकसभा मतदारसंघाचा पसारा असलेल्या हा पदवीधर मतदारसंघ जनता दलाचे शरद पाटील वगळता गेल्या तीस वर्षांत भाजपकडे राहिला आहे. पुण्यातील नारायण वैद्य यांच्यानंतर प्रकाश जावडेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळा भाजपकडून ही निवडणूक जिंकली आहे. आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ भाजपकडे राखण्याचे आव्हान चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून असेल. 

त्यांच्या होमग्राऊंड कोल्हापूरमधून यावेळी माणिक पाटील-चुयेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांची नावे आघाडीवर आहेत. चुयेकर यांनी दोन वेळा कॉंग्रेसकडून ही निवडणूक लढवली असल्याने त्यांना या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेचा पसारा ज्ञात आहे. नवा चेहरा म्हणून महाडिक यांचा आणि चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचे राजकारण महाडिकांच्या काठीने करायचे ठरवले असल्याने त्यांचा अग्रक्रमाने विचार होऊ शकतो. महाडिकांची कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील राजकीय ताकद आणि आर्थिक कुवत लक्षात घेता त्यांचा विचार होऊ शकतो. 

सांगली जिल्ह्यातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि भाजपचे कुशल संघटक मकरंद देशपांडे यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांचे नाव चर्चेत येताच देशमुखांचे नाव पुढे आले आहे. गेल्या काही वर्षांत पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि निष्ठावान म्हणून देशपांडे यांचा नावाचा विचार होऊ शकतो. 

सातारा जिल्ह्यातून शेखर चरेगावकर यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीतून आलेले चरेगावकर यांना फडणवीस सरकारच्या काळात सहकार परिषदेवर अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. भाजपचे सोलापूरचे ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन यांच्या नावाचीही मध्यंतरी चर्चा झाली होती. भाजपकडून या मतदारसंघाचे नेतृत्व सातत्याने पुण्यातील उमेदवाराने केले होते. चंद्रकांत पाटील यांच्यामुळे ही संधी कोल्हापूरला मिळाली. आता ती पुण्याला द्यावी, असा मतप्रवाह आहे.

यावेळी पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव पुढे आले आहे. श्रीमती कुलकर्णी यांनी पक्षादेश मानून भाजपसाठी पुण्यातील सुरक्षित मानला जाणारा कोथरूड विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडला होता. त्या त्यागाबद्दलची परतफेड प्रदेशाध्यक्ष पाटील करतील, अशीही चर्चा पक्ष वर्तुळात आहे; मात्र इथे "जात फॅक्‍टर' आड येण्याची शक्‍यताही व्यक्‍त होत आहे. याशिवाय पुण्यातील अभाविपपासूनच सक्रिय कार्यकर्ते आणि भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, पिंपरी चिंचवडमधील भाजपचे कार्यकर्ते सचिन पटवर्धन यांची नावे चर्चेत आहेत. येत्या महिन्याअखेरीपर्यंत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला, तर जानेवारीपर्यंत निवडणुका होतील. एकूणच पसारा विचारात घेता भाजपला आता उमेदवारी जाहीर करण्यासाठी फार वेळ उरलेला नाही. 

मतदार नोंदणी अशी- 

  • पुणे- 81,182 
  • सातारा- 56,771 
  • कोल्हापूर- 87,326 
  • सांगली- 84,991 
  • सोलापूर- 48,109 
  • एकूण- 3,58,379. 

संपादन : युवराज यादव 
 


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: Graduate Constituency Newsletter: Loyalty or Imported candidate problem in front of BJP