
कोरोनामुळे यावर्षी महाविद्यालये सुरु होण्यास विलंब झाला. यंदा 17 नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरु झाली आहेत
बेळगाव - राणी चन्नमा विद्यापीठ (आरसीयु) अंतर्गत येणाऱ्या पदवीच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा 15 मार्चपासून होणार होत्या. मात्र, कर्नाटक लोकसेवा आयोग (केपीएससी) व सैन्य भरती नेमणुका असल्याने या परीक्षांचे आयोजन 23 मार्चपासून करण्यात येणार आहे. यासंबंधी विद्यापीठाने एक पत्र काढून महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत.
कोरोनामुळे यावर्षी महाविद्यालये सुरु होण्यास विलंब झाला. यंदा 17 नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यामुळे परीक्षाचे नियोजनही उशीराच केले जात आहे. दरवर्षी जानेवारीत परीक्षा होतात. मात्र, यंदा दोन महिने उशीरा परीक्षा होत आहेत. आठ दिवसांपूर्वी विद्यापीठाने पदवीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार कला, वाणिज्य व विज्ञान विभागाचे वेळापत्रकही जाहीर केले होते. मात्र, परीक्षा आठ दिवस पुढे ढकलली असल्याने आरसीयु परीक्षा विभागाला पुन्हा वेळापत्रक बनवावे लागणार आहे.
याचबरोबर बीएडच्या आणि बीपीएडच्या दुसऱ्या सेमीस्टरच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापरीक्षा यापूर्वी 18 मार्चपासून होणार होत्या. याच दरम्यान कर्नाटक लोकसेवा आयोग (केपीएससी) आणि सैन्य भरती नेमणुक असल्याकारणाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांकडून नोट्सची जमवाजमव केली होती. तसेच अभ्यासही अंतीम टप्यात आला होता. मात्र, परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांतूनही नाराजी दिसून येत आहे. मात्र, पुन्हा तारीख झाल्याने विद्यार्थी त्याच जोमाने अभ्यासाला लागले आहेत.
संपादन - धनाजी सुर्वे