
राजकारणात स्त्री पुरुष समानता नाही असे मानले जाते. ते काहीसे खरे असले तरी तासगाव तालुक्यातील झालेल्या निवडीनंतर महिलांनी निम्म्या तालुक्याचा कारभार हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
तासगाव (सांगली) : तासगाव तालुक्यात ३९ गावांत सरपंच, उपसरपंच निवडीनंतर १८ ग्रामपंचायतींत महिलाराज सुरू झाले आहे. २७ सावित्रीच्या लेकींना गाव पातळीवर थेट काम करण्याची संधी मिळाली. याशिवाय तीन महिला सरपंचपदे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे या निवडीत महिलांनी बाजी मारली, असेच म्हणावे लागेल.
राजकारणात स्त्री पुरुष समानता नाही असे मानले जाते. ते काहीसे खरे असले तरी तासगाव तालुक्यातील झालेल्या निवडीनंतर महिलांनी निम्म्या तालुक्याचा कारभार हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ३९ ग्रामपंचायतींचा निकाल लागल्यानंतर ३९१ निवडलेल्या सदस्यांमध्ये २१३ महिला सदस्या निवडून आल्या आहेत. अनेक गावांमध्ये एकूण सदस्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. या ३९ पैकी २१ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित आहे. त्यापैकी १८ ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंचांनी कारभार हाती घेतला आहे. तर कौलगे, विजयनगर आणि जुळेवाडी या तीन ग्रामपंचायतीत महिला सरपंचपदे आरक्षित असूनही त्या त्या गटातील महिला निवडून न आल्याने ती पदे रिक्त राहिली आहेत. त्यापैकी दोन पदे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी. तर एक ओबीसी प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित आहेत.
हेही वाचा- पेट्रोल-डिझेल होणार आता शंभर रुपये लिटर ; दर राहणार चढेच
सर्वसाधारण गटातून नऊ, ओबीसी प्रवर्गातून पाच, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील एक महिला सरपंच झाली आहे. नरसेवाडी आणि गौरगाव या दोन गावामध्ये सरपंच आणि उपसरपंच दोन्ही पदे महिलांकडे आली आहेत. तेथे खऱ्या अर्थाने महिला राज म्हणावे लागेल. तर धुळगाव आणि नागावकवठे या दोन गावातील कारभाराची धुरा मुस्लिम समाजातील महिला सांभाळणार आहेत हे विशेष. एकूणच सावित्रीच्या लेकींचा डंका केवळ शिक्षणात वाजतो आहे असे नाही तर आता राजकारणातही वाजू लागला आहे.
पदाधिकारी-प्रशासन महिलांच्या हाती
तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार, पंचायत समिती सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अशी प्रथम क्रमांकाची पदे ही तालुक्यात महिलाच भूषवत आहेत, हे आणखी विशेष योगायोग.
संपादन- अर्चना बनगे