
बेळगाव - सुटीदिवशीही ग्रामपंचायतीत येऊन रोज सूर्योदयापूर्वी राष्ट्रध्वज फडकावून सूर्यास्ताआधी तो उतरविणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्याकामासाठीच्या मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रध्वज फडकविण्याची जबाबदारी ‘ड’ वर्ग कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, शासनाकडून त्यासाठी स्वतंत्र वेतन मिळत नसून ग्रामपंचायतीच्या करवसुलीतूनच त्यांना मानधन दिले जाते. ते प्रतिदिन ३० रुपये निश्चित केले आहे. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींकडून करवसुली होत नसल्याने मानधनही मिळत नसल्याचे चित्र आहे.
राष्ट्रध्वज जबाबदारीचेही मानधन मिळते
लोकांमध्ये देशाभिमान वाढविण्यासाठी शासनाने २०१३ मध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीवर रोज राष्ट्रध्वज फडकाविण्याचा आदेश बजावला. मात्र, त्यासाठी स्वतंत्र असे वेतन जाहीर केलेले नाही. ही जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातूनच मानधन देण्याचा आदेश आहे. त्यामुळे, मासिक वेतनासह त्यांना राष्ट्रध्वज जबाबदारीचेही मानधन मिळते. पण, हे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत राहिले आहे. ग्रामपंचायतीच्या सामान्य अनुदानातून (निधी-२) रोज ३० रुपये असे मासिक ९०० रुपये मानधन देणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायती असून एकाही पंचायतीत राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नाही. पंचायतीचे ‘ड’ वर्ग कर्मचारी ही जबाबदारी नियमित पार पाडतात.
ध्वजसंहितेप्रमाणे ध्वजारोहणाचे काही नियम
साप्ताहिक असो वा सणासुदीची सुट्टी या कर्मचाऱ्यांना ही जबाबदारी पार पाडावीच लागते. त्यामुळे, त्यांना रजा मिळत नाही. एखादे दिवशी रजा हवी असल्यास दुसऱ्या व्यक्तीकडे ती जबाबदारी देऊन रजा घ्यावी लागते. मात्र, ध्वजसंहितेप्रमाणे ध्वजारोहणाचे काही नियम असून त्याचे उल्लंघन झाल्यास किंवा ध्वज उलटा फडकल्यास कारवाईही होते. त्यामुळे, अनेकजण हा धोका न पत्करता स्वतःच ती जबाबदारी पार पाडतात. ग्रामपंचायतीकडून वसूल केल्या जाणाऱ्या कराच्या रकमेतून मानधन दिले जाते. पण, अनेक ग्रामपंचायतीमध्ये कर जमा करण्यावर भर दिला जात नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतींनी कराच्या माध्यमातून जमा होणाऱ्या महसुलातून मानधन अादा करण्याची सूचना सर्व ग्रामपंचायतींना करण्यात आली आहे. कोणत्याही कारणाखाली ध्वजाची जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत ठेवू नये, अशी सूचना सर्व पीडीओंना केली आहे.
- एस. बी. मुळळ्ळी, उपसचिव, जिल्हा पंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.