esakal | ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना करावा लागतोय मोबाईल स्वीच ऑफ... पण का?
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat office bearers have to switch off mobile ... but why?

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत; मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या शिगाव (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायत प्रशासनाला याची भलतीच डोकेदुखी होऊन बसली आहे.

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना करावा लागतोय मोबाईल स्वीच ऑफ... पण का?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बागणी ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत; मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या शिगाव (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायत प्रशासनाला याची भलतीच डोकेदुखी होऊन बसली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. सांगली जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना बाधित आढळत आहेत. लॉकडाउनच्या सुरुवातीपासूनच सावधगिरी व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा बंदी करण्यात आली आहे. बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तीपासून कोरोना विषाणू होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात प्रवेश करताना सीमेवर चेकपोस्ट कार्यरत आहेत. तेथे येणाऱ्या व जाणाऱ्यांची कसून तपासणी होते. अत्यावश्‍यक कारण असेल तरच त्याला प्रवेश दिला जातो. जीवनावश्‍यक वस्तू, पेट्रोलियम पदार्थ, दूध, भाजीपाला, औषधे, धान्य, वैद्यकीय उपकरणे वगळता जिल्ह्यातून येणारी व जाणारी पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे; 

मात्र या परिस्थितीत जिल्ह्याच्या सीमा ओलांडण्यासाठी ग्रामपंचायतीचे परवानगी पत्र मिळवण्यासाठी अनेकांचा हट्ट सुरू आहे. वेगवेगळ्या कारणासाठी सीमा ओलांडून जाण्याची परवानगी मागण्यासाठी लोक ग्रामपंचायत प्रशासनाकडे हेलपाटे मारत आहेत. त्यात अत्यावश्‍यक कामांसाठी जाणारे थोडेच, मात्र किरकोळ कारणासाठी परवानगी मागणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दररोज असे परवानगी पत्र मागणारे मोठ्या संख्येने येत असल्याने ग्रामपंचायतीची डोकेदुखी वाढली आहे.

त्यांचा तगादा टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आपला मोबाईल स्वीच ऑफ करण्याची वेळ आली आहे. शिगाव ग्रामपंचायतीने आजपर्यंत अत्यावश्‍यक सेवेसाठी जाणाऱ्या 40-45 जणांना परवाने देऊन सहकार्य केले आहे. आता या निर्णयासाठी कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 

कोणालाही लेखी पत्र मिळणार नाही

आजपर्यंत अत्यावश्‍यक सेवेसाठी सीमाभाग ओलांडून जाण्यासाठी परवानगी दिली आहे; मात्र येथून पुढे कोणत्याही कारणासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणालाही लेखी पत्र मिळणार नाही. 
- उत्तम गावडे, शिगाव, सरपंच.