
राम नवमी निमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तानच्यावतीने राम नवमीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी श्री रामाचा जयजयकार करीत हजारो कार्यकर्ते शोभायात्रेत सहभागी झाले होते. तसेच ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि भगवे ध्वज यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. पावसामुळे शोभा यात्रा सुरू होण्यास विलंब झाला होता मात्र रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता.
दरवर्षी रामसेना हिंदुस्तानच्या वतीने राम नवमी दिवशी मोठ्या प्रमाणात शोभायात्रा काढण्यात येते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे शोभायात्रा काढण्यात आली नव्हती. मात्र यावेळी सण उत्सवावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्यामुळे रामसेनेतर्फे भव्य प्रमाणात शोभायात्रा काढण्यात आली. प्रारंभी नागनाथ महाराज व दीपा कुडची यांच्या हस्ते पालखी पूजन तर पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्या हस्ते श्री रामांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तर संतोष मंडलिक, अमित देसाई व मयूर बसरीकट्टी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर चनम्मा सर्कल, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली आदी भागातून शोभा यात्रा काढण्यात आली.
शोभा यात्रेच्या अग्रभागी श्री राम, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सजविलेले पुतळे होते. तसेच आरंभ ढोल ताशा पथक, लेझीम व डॉल्बीवर जय जय श्रीरामाचा अखंड गजर यामुळे शोभायात्रेत सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत होते. शोभायात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी फुलांची उधळण करून स्वागत केले जात होते. तसेच भगवे फेटे बांधून व भगवे ध्वज घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे सर्व मार्गावर भगवामय वातावरण दिसून येत होते शोभायात्रेच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Web Title: Grand Procession In Belgaum On The Occasion Of Ram Navami
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..