esakal | द्राक्ष हंगाम : चार लाख लोकांचा रोजगार धोक्‍यात; द्राक्षवेलींवर अपेक्षित घड नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Grape season: Employment of four lakh people in danger; There is no expected bunch on the vines

हंगामात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉंकडाऊनचा मोठा आर्थिक फटका पलूस तालुक्‍यासह सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना बसला.

द्राक्ष हंगाम : चार लाख लोकांचा रोजगार धोक्‍यात; द्राक्षवेलींवर अपेक्षित घड नाही

sakal_logo
By
संजय गणेशकर

पलूस (जि. सांगली) : गेल्या हंगामात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉंकडाऊनचा मोठा आर्थिक फटका पलूस तालुक्‍यासह सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना बसला. यावर्षीही द्राक्षवेलीवर अपेक्षित द्राक्षघड नसल्याने आणि पीक छाटणी एकाच वेळी झाल्याने द्राक्षबागायतदार आणखी अडचणीत येण्याची भिती आहे. तसेच या हंगामावर अवलंबून असणाऱ्या चार लाख लोकांचाही रोजगार अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या हंगामात मार्चमध्ये द्राक्षे बाजारपेठेत पाठविण्याच्या वेळेतच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. लॉंकडाऊनमुळे द्राक्षाला बाजारपेठ उपलब्ध नव्हती. व्यापारी, दलाल फिरकले नाहीत. तर, काहिंना कवडीमोल दरात द्राक्षखरेदी केली. यामध्ये द्राक्षबागायतदार आर्थिक अडचणीत आला आहे. 
द्राक्षाचा उत्पादन खर्चही भागला नाही. कर्जे थकबाकीत गेली. तरीही न थांबता एप्रिल छाटणी घेतली. मात्र, कोरोनाबरोबरच पावसाने पाठ सोडली नाही. अगोदरच बाजारपेठ न मिळाल्याने द्राक्षे जास्त दिवस वेलीवर राहीली. पीक छाटणी वेळेत नाही. त्यामुळे काडीची गर्भधारणा व्यवस्थित न झाल्याने 50 टक्के द्राक्ष घड कमी आहेत. सुपर सोनाक्का, एस. एस. जातीच्या द्राक्षाला फटका बसला आहे. 

तरीही लहरी निसर्गाला तोंड देत आहे. ती द्राक्षे दर्जेदार करणेसाठी द्राक्षबागायतदारांची धडपड सुरू आहे. यावर्षी 1 आँक्‍टोंबर ते 20 नोव्हेंबरमध्ये पीक छाटण्या झाल्याने बाजारपेठेत एकाच वेळी द्राक्ष येणार आहेत. याचा परिणाम दरावरही होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार आणखी आर्थिक संकटात येण्याची भिती आहे. 

15 लाख उत्पन्न 
सांगली जिल्ह्यातून दरवर्षी 15 लाख टनापेक्षा जास्त द्राक्ष उत्पन्न आहे. यातील 35 टक्के द्राक्षाचा बेदाणा होतो.15 टक्के द्राक्षे निर्यात होतात. द्राक्ष शेतीमुळे 4 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. मात्र, हीच शेती सद्या अडचणीत आहे. 

आर्थिक कसरत 
कोरोनाचा आर्थिक फटका बसल्याने पीक कर्ज भागले नाही. नवीन कर्ज मिळत नाही. खते व औषधे उधारीवर मिळत नाहीत. त्यामुळे यावर्षी द्राक्षबागायतदारांची आर्थिक कसरत सुरू आहे. 

पीक कर्जमर्यादा करावी

द्राक्षबागेचा उत्पादन खर्च एकरी दोन लाख रुपयांपर्यंत आहे.खते, औषधे,मजूरीचे दर वाढलेत. उत्पादन खर्च वाढला आहे. लहरी हवामान आहे. द्राक्षासाठी बॅंकांनी एकरी दोन लाख रुपये पीक कर्जमर्यादा करावी. 

- पांडुरंग संकपाळ, द्राक्षबागायतदार, बांबवडे. 

संपादन : युवराज यादव 

loading image