इथली द्राक्ष निघाली परदेशी...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

तासगाव पश्‍चिम भागात निमणी, तुरची परिसरात द्राक्ष हंगामाची सुरवात जोराने झाली आहे. ही द्राक्षे दुबई एक्‍स्पोर्ट, मुंबई, बंगळूर, चेन्नई, गोवाकडे रवाना होऊ लागली आहेत. 

येळावी ः तासगाव पश्‍चिम भागात निमणी, तुरची परिसरात द्राक्ष हंगामाची सुरवात जोराने झाली आहे. वेगवेगळ्या जातीच्या द्राक्ष प्रतीनुसार द्राक्षांना पावणेदोनशे ते चारशे रुपये प्रतीपेटी दर मिळत आहे. परिणामी यंदा द्राक्षदर चांगला मिळाल्याने बागायतदारातून समाधान व्यक्त होत आहे. ही द्राक्षे दुबई एक्‍स्पोर्ट, मुंबई, बंगळूर, चेन्नई, गोवाकडे रवाना होऊ लागली आहेत.

तासगाव पश्‍चिम भागासह निमणी, तुरची, नेहरूनगर, येळावी व नागाव परिसरात द्राक्षबागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरातून दरवर्षी आगाप छाटणी घेऊन निर्यातक्षम द्राक्षे पिकवली जातात. मात्र यंदा ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यातच संततधार पाऊस व ढगाळ वातावरण राहिल्याने अनेक द्राक्षबागायतदारांनी आगाप फळछाटणी घेण्याचे धाडस केले नव्हते. मात्र ज्या द्राक्षबागायतदारांनी धाडसाने याच महिन्यात आगाप फळछाटणी घेतली होती अशा द्राक्षबागांचे त्यावेळच्या पावसामुळे डाऊनी व करपा या रोगामुळे परिसरातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या विविध संकटातून टिकवलेल्या द्राक्षबागांच्या द्राक्षांना सुरवातीच्या आगाप हंगामासही द्राक्ष दर सुमारे चारशे प्रती पेटी दर मिळाला. मात्र एकरी द्राक्ष उत्पादनात मात्र मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या मागास फळ छाटणी घेतलेल्या द्राक्षबांगांची द्राक्षे विक्रीस सुरवात झाली आहे. यावेळी वेगवेगळ्या द्राक्षांना वेगवेगळे दर मिळत असून तास-ए गणेश, सोनाका, सुपर सोनाका, एस एस व शरद या द्राक्षांना पावणेदोनशे ते चारशे रुपये प्रतीपेटी दर मिळत असल्याने द्राक्ष बागायातादारातून समाधान व्यक्त होत आहे.

परंतु सध्या ही द्राक्षे खरेदीसाठी द्राक्षदलालासह काही मॉलही द्राक्षे खरेदी करीत असल्याने हा द्राक्ष दर चांगला मिळत असल्याचे बागयतदारातून सांगितले जाते. एकीकडे आगाप फळछाटणी घेतलेल्या बागायतदारांनी दिलेल्या माहितीनुसार द्राक्षांना मिळणारा दर चांगला असला तरी यंदाचा अनियमित पाऊस व ढगाळ वातावरण अशा विचित्र हवामानामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव होऊन मिळणारे एकरी उत्पादन खूपच कमी झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grapes being exported from sangali