चोरट्याने चक्‍क द्राक्षेच नेली कापून... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

काल रात्री येथील एका शेतकऱ्याचे सुमारे पाचशे किलो द्राक्षे अज्ञात चोरट्यानी काढून लांबवली. बदनामी नको म्हणून हा शेतकरी गप्प आहे. मात्र या चोरीची चर्चा मात्र परिसरात सुरू आहे.

वाळवा : कधी कशाची कुठे चोरी होईल याचा अंदाज करणे अशक्‍यच. चोरटे आत्ता तर प्रोफेशनल झाले आहेत. कारण सोने, पैसे, भांडी, वाहने यांच्या चोऱ्या सर्वश्रुत आहेत. त्यात गेल्या आठवड्यात अज्ञात चोरट्यांनी शरीर सौष्ठवासाठी वापरल्या जाणाऱ्या पूरक खाद्याचा साठा लंपास केला आहे. हे कमी की काय म्हणून काल रात्री येथील एका शेतकऱ्याचे सुमारे पाचशे किलो द्राक्षे अज्ञात चोरट्यानी काढून लांबवली. बदनामी नको म्हणून हा शेतकरी गप्प आहे. मात्र या चोरीची चर्चा मात्र परिसरात सुरू आहे. 

गावात येणाऱ्या एका रस्त्यालगत या शेतकऱ्याची द्राक्षबाग आहे. दोन वर्षांपासून या शेतकऱ्याने काळ्या द्राक्षांची बाग फुलवली आहे. सध्या या बागेतील द्राक्षाची कापणी सुरू आहे. बागेतील काही टन द्राक्षे संबंधित व्यापाऱ्याने काढली आहेत. अजून काही कापणी बाकी आहे. हीच संधी साधून अज्ञाताने रात्रीच्या अंधारात जवळपास पाचशे किलो द्राक्षे कापून नेली आहेत.

यंदा अतिवृष्टीने आधीच द्राक्षे "आंबट' झाली आहेत. सरासरीच्या तुलनेत यंदा खूपच कमी द्राक्ष उत्पादन झाले आहे. दरवर्षी व्यापारीवर्गाच्या मागे लागून द्राक्षे घ्या, म्हणून शेतकरी पिच्छा पुरवतात. यंदा मात्र व्यापारी जास्त आणि द्राक्षे कमी असे चित्र निर्माण झाले आहे. त्यात दरही काही प्रमाणात परवडणारे आहेत. नेमक्‍या याच बाबीचा अंदाज घेऊन चोरट्याने द्राक्षावर डल्ला मारला आहे. याबाबत कुठेही नोंद नाही. मात्र चर्चा खुमासदार सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grapes theft in Sangli