हिरव्या बेदाण्याला 255 उच्चांकी दर; तासगाव बाजापेठेत 400 टन आवक

रवींद्र माने
Sunday, 14 February 2021

तासगाव येथील बेदाणा बाजारपेठेत नव्या बेदाण्याची जोरदार आवक सुरू असून, आज झालेल्या सौद्यात हिरव्या बेदाण्याला 255 रु. किलो दर मिळाला.

तासगाव (जि. सांगली) : तासगाव येथील बेदाणा बाजारपेठेत नव्या बेदाण्याची जोरदार आवक सुरू असून, आज झालेल्या सौद्यात हिरव्या बेदाण्याला 255 रु. किलो दर मिळाला. आतापर्यंतचा हा विक्रमी दर आहे. आज बेदाणा सौद्यांत 400 टन बेदाण्याची आवक झाली. नव्या बेदाणा तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे. 

बाजार समिती आवारातील बाजारपेठेतील 15 बेदाणा अडत दुकानांत बेदाणा सौदे झाले. यावेळी भूपाल पाटील यांच्या धारेश्वर ट्रेडिंग कंपनी या दुकानात राजाराम दादू महाजन (वाळवा) या शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्यास 255 रुपये असा उच्चांकी दर मिळाला. हा दर यावर्षीचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक दर आहे.

हा बेदाणा राजयोग ओव्हरसिजचे योगेश कबाडे यांनी खरेदी केला. 
या सौद्यांत 26 हजार 820 बॉक्‍स, 400 टन, 40 गाडी आवक झाली. प्रत्यक्ष 16 हजार 730 बॉक्‍स, 250 टन, 25 गाडी विक्री झाली. यात सर्वच नवीन बेदाण्याची विक्री झाली असून, यावेळी हिरव्या बेदाण्यास 105 ते 255, पिवळा बेदाण्यास 100 ते 160 व काळ्या बेदाण्यास 35 ते 70 असा दर मिळाला. तासगावात बेदाण्यास चांगले दर मिळत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

तासगाव बाजार समितीमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकातून बेदाणा विक्रीसाठी येत आहे, तर चांगल्या प्रतीच्या बेदाण्यास अपेक्षित उच्चांकी दर मिळत आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाणा येथे विक्री साठी आणावा, असे आवाहन सभापती अजित जाधव व सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green raisins got highest rate; 400 tons arrives at Tasgaon market