ते पुढे सरसावले नि पेटली मजुरांची चूल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

त्यांनी शंभर लोकांना आठ दिवसासाठी पुरेल एवढा किराणा पुरविला आणि या मजूरांना तात्पुरता दिलासा मिळाला.उर्वरित तालुक्‍यातील गरजूंनाही हे युवक मदत करणार आहेत. या युवकांनी यापूर्वीच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस बांधवांना व गरजूंना जामखेड येथे दोन वेळच्या जेवणाची सोय केलेली आहे.

जामखेड : पोटाची भूक भागवण्यासाठी रोजगाराची वाट शोधीत बीड जिल्ह्यातील शंभर मजूर जामखेड तालुक्‍यातील आपटी गावाला आले आणि लॉकडाऊन मुळे अडकून पडले. 
गेली तेरा दिवस कधी उपासमार तर कधी मिळेल ते खाल्ले आणि पोटाची खळगी भरली.

ही बाब तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या लक्षात आली. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना मदतीसाठी आव्हान केले आणि उद्योजक सागर आंदुरे , युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते राहुल उगले आणि गौतम पवार यांनी पुढाकार घेतला आणि शंभर लोकांना आठ दिवस पुरेल एवढे किराणा सामान पुरवले. त्यांनी दाखविलेले औदार्य निश्‍चितपणे कौतुकास पात्र ठरणार आहे. तसेच समाजातील इतर व दातृत्व संपन्न व्यक्तीने असेच पुढे आले पाहिजे असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.

हेही वाचा- इथे हनुमानाचा रथ ओढातात स्त्रीया

दोन महिनाभरापूर्वी रोजगाराच्या निमित्ताने निमित्ताने बीड जिल्ह्यातील 100 मजूर जामखेड तालुक्‍यातील आपटी या गावी आले होते. हे मजूर विहीर खोदाईचे व शेतीचे काम करणारे होते. मात्र लॉंकडाऊन झाल्यामुळे या परिसरातील सर्व विहिरी खोदाईचे व शेतीची कामे बंद झाले आणि या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. 

आता त्यांच्यापुढे पोटाची खळगी भरण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि अशाच वेळी कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे विशाल नाईकवाडे यांची नजर या उपासमारीच्या वाटेवर असलेल्या मुजराकडे गेली आणि त्यांनी या मजुरांना दोन वेळचे जेवण देण्यासाठी नियोजन हाती घेतले, याकरता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आणि त्यांच्या आवाहनाला उद्योजक सागर आंदुरे, युवक कार्यकर्ते राहुल उगले आणि गौतम पवार या युवकांनी दाद दिली आणि ते मदतीसाठी धावून आले .

त्यांनी शंभर लोकांना आठ दिवसांसाठी पुरेल एवढा किराणा पुरविला आणि या मजूरांना दिलासा मिळाला.उर्वरित तालुक्‍यातील गरजूंनाही हे युवक मदत करणार आहेत. या युवकांनी यापूर्वीच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस बांधवांना व गरजूंना जामखेड येथे दोन वेळच्या जेवणाची सोय केलेली आहे. लॉंकडाऊन सुरु असे पर्यंत हा उपक्रम सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
तहसीलदारांकडून घडते माणुसकीचे दर्शन ! 
अधिकारी म्हणून काम करताना नियमाच्या चौकटीला अधीन राहून काम करणारे लालफितीतीतील अधिकारी सर्वत्र पहायला मिळतात मात्र त्या पलीकडे जाऊन आपल्यातला माणूस जिवंत ठेवून काम करणारे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यासारखे अधिकारी क्वचितच आढळतात. लॉंकडाऊनच्या निमित्ताने तालुक्‍यात राहणाऱ्या कोणालाही उपासमारीची वेळ येणार नाही याची काळजी घेतात, याची प्रचिती अनेक प्रसंगातून पहायला मिळते आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Groceries given to laborers in Jamkhed