इथे हनुमंताचा रथ ओढतात, त्याही स्त्रीया... यंदा काय होणार

At Sangamner, women draw the chariot of Hanumanta
At Sangamner, women draw the chariot of Hanumanta

संगमनेर ः संगमनेर शहरातल्या लेकी-सुनांकडून ओढल्या जाणाऱ्या हनुमानाच्या विजय रथाच्या मिरवणूकीला ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेला आव्हान देणाऱ्या रणरागिणींचा इतिहास आहे. ब्रिटिशांनी बंदी घातल्यानंतरही महिलांनी तो रथ ओढण्याची परंपरा कायम ठेवली होती. मात्र, यंदा ही परंपरा कोरोनामुळे खंडीत होणार आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी शहरातील चंद्रशेखर चौकातल्या मोठा मारुती मंदिरासमोर सजवलेल्या रथातून उत्सवमूर्तीच्या मिरवणूकीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. 1925 च्या सुमारास गावातील नामदेव सुतार या कसबी कलाकाराने बनविलेल्या लाकडी रथाच्या दर्शनी भागात कमानीवर शिवाजी महाराज व महात्मा गांधींच्या कोरीव मूर्ती आहेत.

या मूर्ती खटकत असल्याने, हिंदू मुस्लीम दंग्याचे कारण सांगून, 1927 साली ब्रिटीश सरकारने मिरवणूकीवर बंदी आणल्याने, संतप्त झालेल्या नागरिकांनी बंदी हुकूम मोडून रथयात्रा काढली. मात्र या मार्गावरील मशिदीसमोरुन जाणारा रथ रोखून, त्यातील मूर्ती काढून घेतली गेली, यामुळे भाविकांनी दीड महिना त्याच जागेवर रथ उभा ठेवून संताप व्यक्त केला. याच प्रकाराची पुनरावृत्ती 1928 मध्येही झाली.

या दरम्यान धार्मिक परंपरेवर टाच आणणाऱ्या ब्रिटीश सत्तेविरोधात खदखद वाढत होती. 1929 साली कोणत्याही प्रकारे ही मिरवणूक पूर्ण करण्याचा संकल्प नागरिकांनी केला होता. यासाठी झुंबरबाई अवसक या कष्टकरी विधवा महिलेच्या नेतृत्वाखाली महिलांनीही दोन तीन आठवड्यांपासून बेत आखला होता.     

स्फोटक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीच्या कलमामुळे संगमनेरला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. 23 एप्रिल 1929 रोजी रथात उत्सवमूर्ती ठेवताना उडालेल्या गडबडीचा फायदा घेत, झुंबरबाईंनी पदराआड लपवून आणलेली हनुमानाची फोटो फ्रेम रथात ठेवली. त्यांच्याबरोबर बंकाबाई परदेशी, लीलाबाई पिंगळे आदींसह इतर स्त्रियाही होत्या. पोलिसांना काही कळण्याच्या आत हनुमानाचा जयजयकार करीत, या रणरागिणींनी विजयरथ ओढीत पुढे नेला.  पोलिसांच्या डोळ्यात गुलाल फेकून, बत्ताशे, नारळाचा मारा करीत, महिलांनी प्रदक्षिणा पूर्ण करुन ब्रिटीशांना आव्हान दिले. 

कालांतराने ब्रिटीशांना जनतेच्या श्रध्देपुढे नमते घ्यावे लागले. मात्र, तेव्हापासून सुरु झालेल्या परंपरेनुसार या विजयरथाच्या मिरवणूकीचा प्रारंभ करण्याचा मान महिलांना मिळाला तो 91 वर्षांनंतरही अभिमानास्पदरित्या सुरु आहे.

बाल ब्रह्मचारी हनुमानाचा रथ ओढण्याचा मान स्त्रियांना असणारे संगमनेर हे कदाचित राज्यातले नव्हे तर भारतातले एकमेव शहर असावे. या परंपरेनुसार शहराच्या पोलिस ठाण्याचे निरीक्षक सन्मानपूर्वक भगवा ध्वज रथावर चढवून या रथयात्रेला प्रारंभ करतात. मात्र या वेळी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत सर्व धार्मिक उत्सवांवर बंदी आल्याने, ब्रिटीशांच्या सत्तेला आवाहन देणारी ही परंपरा या वर्षी खंडीत होणार आहे.

देशावर कोसळलेल्या या भयंकर संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन झुंजते आहे. त्यांना साथ देण्यासाठी या वर्षी रथयात्रेची परंपरा खंडीत करुन, मोजक्या लोकांनी धार्मिक पूजा करण्याचे नियोजन केले आहे.

- सोमनाथ पराई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com