esakal | ग्राउंड रिपोर्ट ः मुकुंदनगर, गोविंदपुरा मोहल्ल्याच्या वेदनाही "सील'! नागरिक अन्नालाही मोताद
sakal

बोलून बातमी शोधा

Twenty-four foreign nationals arrested after Mercury

एखाद्याला तातडीने डॉक्‍टरांकडे नेण्यासाठी ऍम्ब्युलन्सची गरज भासल्यास अधिकाऱ्यांची मान्यता घेण्यातच बराच वेळ जातो. मागवलेली औषधेही दोन-तीन दिवसांनंतर मिळतात. परिसरातील मेडिकल व डॉक्‍टरांनाही घराबाहेर पडू दिले जात नाही

ग्राउंड रिपोर्ट ः मुकुंदनगर, गोविंदपुरा मोहल्ल्याच्या वेदनाही "सील'! नागरिक अन्नालाही मोताद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : मुकुंदनगरमध्ये कोरोनाची बाधा झालेले सहा रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने हा परिसर "सील' केला. मुकुंदनगरला लागून असलेला गोविंदपुरा परिसरही "सील' केला. आज सतरा दिवस झाले, लोक घरात बसून आहेत. त्यांच्यापर्यंत औषधे, भाजीपाला, किराणा आदी जीवनावश्‍यक गोष्टी महत्प्रयासाने पोचवल्या जात आहेत. प्रशासनाने हा परिसर नव्हे, तर "आमच्या वेदनाच "सील' केल्या' अशी भावना तेथील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. 

कोरोनाचे सहा रूग्ण

मुकुंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित सहा रुग्ण आढळून आले आहेत. यातील केवळ दोनच जण मुकुंदनगरमधील रहिवासी असून, उर्वरित दोघे परदेशी व दोघे मुंबईमधील आहेत. दोन स्थानिक नागरिकही आता बरे झाले असून, आगामी दोन-तीन दिवसांत त्यांना घरीही सोडण्यात येणार असल्याचे समजते. 

पहाटेच परिसर सील
नगर शहराबरोबरच मुकुंदनगर परिसरही जिल्हा प्रशासनाने सुरवातीपासूनच लॉकडाउन केला होता. प्रशासनाने 9 एप्रिलला शब्बे बारातच्या दिवशी मुकुंदनगर परिसरात संपूर्ण संचारबंदी लागू केली होती. दुसऱ्या दिवशी 10 एप्रिलला पहाटेच प्रशासनाने मुकुंदनगर व गोविंदपुरा परिसर "सील' करून टाकला. गेल्या आठ दिवसांपासून हा परिसर "सील' आहे. तेथील सुमारे 70 टक्के लोक मोलमजुरी करणारे, रिक्षाचालक, ड्रायव्हर, फीटर आहेत. त्यांची उदरनिर्वाहाची साधने बंद आहेत. हातावर पोट असल्यामुळे आठवडा ते पंधरा दिवस पुरेल एवढाच किराणा व खाद्यपदार्थ घरात बाळगणाऱ्या या नागरिकांकडचा किराणा व खाद्यपदार्थ आणि पैसेही यापूर्वीच संपले होते.

मदत करणाऱ्यांच्याच घरात टंचाई 
घरात अन्नाचा कणही नसताना कुणाकडे उसने मागायला जायचीही सोय उरली नाही. सुरवातीला या गरिबांना परिसरातीलच मध्यमवर्गीयांनी सढळ हाताने मदत केली. मात्र, आता मदत करणाऱ्यांच्याच घरात किराणा व औषधांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे कोंडी झाली आहे. प्रत्येक घरात लहान मुले आहेत. रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड आदीचे पेशंटही आहेत. त्यांना औषधे आणि उपचार मिळत नाहीत. भाजीपाला व किराणा महाग मिळतो. आधीच खिशात पैसे नसल्यामुळे या चढ्या दराच्या वस्तू मिळविताना दमछाक होत आहे.

अॅम्ब्युलन्सची रवानगी घेण्यातच जातो वेळ

एखाद्याला तातडीने डॉक्‍टरांकडे नेण्यासाठी ऍम्ब्युलन्सची गरज भासल्यास अधिकाऱ्यांची मान्यता घेण्यातच बराच वेळ जातो. मागवलेली औषधेही दोन-तीन दिवसांनंतर मिळतात. परिसरातील मेडिकल व डॉक्‍टरांनाही घराबाहेर पडू दिले जात नाही. महापालिकेकडूनही दिली जाणारी मदत या मोठ्या व विस्तीर्ण परिसराला अपुरी ठरत आहे. परिसर सील असल्यामुळे महापालिका देत असलेल्या मदतीला मर्यादा येत आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला सांगूनही अजून मुकुंदनगर व गोविंदपुरा परिसरात स्वस्त धान्य नागरिकांना उपलब्ध झालेले नाही. 

रमजान महिन्यावर भुकेचे सावट 
जिल्हा प्रशासनाने हा परिसर 23 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 24 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या रमजान महिन्याच्या तयारीसाठी किमान दोन ते तीन दिवस लागतात; मात्र प्रशासनाकडून केवळ एकच दिवस मिळाला आहे. या महिन्यात मोठ्या प्रमाणात पिठाची आवश्‍यकता भासते. मात्र, घरात धान्याचा कणही उरलेला नाही. अशा परिस्थितीत रमजान महिना कसा साजरा करायचा, हा प्रश्न या नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. 

घरात पीठही उरले नाही

गोविंदपुरा व मुकुंदनगरमध्ये बऱ्याच लोकांच्या घरात पीठही उरले नाही. त्यामुळे प्रशासनाने गहू देण्याऐवजी तांदूळ द्यावा. गहू दिल्यास गिरण्या बंद असल्यामुळे पुन्हा उपासमारीची वेळ येऊ शकते. तांदूळ व डाळी मिळाल्यास किमान वरण-भातावर तरी पोट भरता येईल. अन्यथा नागरिक कोरोनामुळे नव्हे, तर भुकेमुळे मरतील. 
- वहाब सय्यद, नागरिक, मुकुंदनगर 

मुकुंदनगर, गोविंदपुऱ्यात... 
लोकसंख्या ः सुमारे 60000 
व्याधिग्रस्त नागरिक ः पाच हजार 
औषध दुकाने ः 24 
छोटी-मोठी किराणा दुकाने ः 125 
पीठ गिरण्या ः 23 
डॉक्‍टर ः 18 

loading image