दुचाकी स्पर्धाप्रकरणी ग्रुप ऍडमीनची चौकशी; 19 जणांवर गुन्हे

शैलेश पेटकर
Sunday, 27 December 2020

सांगलीवाडीतील चिंचबागेत विनापरवाना मोटारसायकलच्या सौंदर्य स्पर्धाप्रकरणी 9 दुचाकी मालकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

सांगली ः सांगलीवाडीतील चिंचबागेत विनापरवाना मोटारसायकलच्या सौंदर्य स्पर्धा, सायलेन्सर काढून पळवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. याप्रकरणी काल शहर पोलिसांनी कारवाई करून 30 दुचाकी जप्त केल्या होत्या. तर त्यावेळी दुचाकी टाकून अनेक दुचाकीस्वार पळून गेले होते.

दुचाकी टाकून पळून गेलेल्या 19 दुचाकी मालकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तर सौंदर्य स्पर्धा, सायलेन्सर काढून पळवण्याच्या स्पर्धा भरवण्याबाबतचा संदेश अनेकांच्या मोबाईलवरून फॉरवर्ड करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी संबंधित ग्रुप ऍडमीनलाही चौकशीसाठी बोलविण्यात आली. काही अक्षेपार्ह गोष्टी पालकांच्या नजरेस पोलिसांनी आणून दिल्या, अशी माहिती पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगलीवाडी येथील चिंचबागेत काल दुपारी विनापरवाना दुचाकींच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मॉडीफाय केलेल्या आणि दुचाकींच्या सायलेंसरमध्ये बदल केलेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या दुचाकीस्वारास रोख पारितोषिक आणि ढाल बक्षीस दिली जाणार होती. या स्पर्धेसाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दुचाकीस्वार मोठ्या संख्येने आले होते. तसेच या स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचीही मोठी गर्दी झाली होती. सायलेन्सर काढलेल्या दुचाकींचा गोंगाट आणि स्पर्धेमुळे मोठा गोंधळ उडाला होता. 

याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी याबाबत सहायक निरीक्षक नीलेश बागाव यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिस पाहताच स्पर्धक आणि प्रेक्षकांची धावपळ सुरू झाली. पोलिसांनी तेथील 30 दुचाकी ताब्यात घेतल्या. तर अन्य स्पर्धक दुचाकी टाकून पळून गेले. पोलिसांनी दुचाकी जप्त करून पोलिस ठाण्यात आणल्या. संबंधित दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, स्पर्धेचा हा मेसेज व्हॉटस्‌ऍप ग्रुपवरून पाठविल्याचे पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांना समोर आले. त्यानुसार ऍडमीनची चौकशी करण्यात आली. अनेक अक्षेपार्ह ग्रुप दिसून आले. ही बाब संबंधित मुलांच्या पालकांना सांगण्यात आले. त्यामुळे मुलांच्या मोबाईलमध्ये नेमका ग्रुप आहे, हेही पालकांसमोर आले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Group Admin will be Inquired into Bike Competition; Crimes against 19 people