esakal | "जीएसटी'ची कोट्यवधीची फसवणूक; मिरजेत मोबाईल विक्रेत्यावर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

GST fraud in Miraj; action against mobile seller

मिरज शहरातील एका मोबाईल विक्रेत्यावर केंद्रीय जीएसटी विभागाच्या गुप्तचर महासंचालनालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी कारवाई केली आहे.

"जीएसटी'ची कोट्यवधीची फसवणूक; मिरजेत मोबाईल विक्रेत्यावर कारवाई

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज (जि. सांगली) : शहरातील एका मोबाईल विक्रेत्यावर केंद्रीय जीएसटी विभागाच्या गुप्तचर महासंचालनालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी कारवाई केली आहे. कारवाई झालेल्या विक्रेत्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले. 

केंद्रीय जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने काल (ता. 9) शहरात रात्री साडेआठच्या सुमारास विक्रेत्याचे निवासस्थान आणि दुकानावर एकाच वेळी धाड टाकली. या वेळी केलेल्या तपासणीत संबंधित विक्रेत्याने बोगस बिले तयार करून त्याद्वारे कोट्यवधी रुपयांचा आवक कर परतावा (इनपुट क्रेडिट टॅक्‍स) घेतल्याचे निदर्शनास आले. फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. केंद्रीय जीएसटी विभागातील परताव्यासाठी ऑनलाइन पद्धतीने कराव्या लागणाऱ्या औपचारिकतेतच अशा पद्धतीची फसवणूक उघडकीस येण्यास मोठी संधी आहे. ज्याची फसवणूक करणाऱ्यास सहजासहजी जाणीव होत नाही. 

येथे शिवाजी चौकातील पत्ता दाखविलेल्या या मोबाईल विक्रेत्याने मोबाईल विक्री, दुरुस्ती, रिचार्ज, याशिवाय डीटीएच रिचार्ज याद्वारे बिहार, गुजरात, आणि मध्य प्रदेशात आपला व्यवसाय दाखविल्याचे बिलाद्वारे भासविले आहे. हीच बाब केंद्रीय जीएसटी विभागाच्या गुप्तचर महासंचालनालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.

त्यामुळे या विक्रेत्याच्या व्यवहारांवर काही महिन्यांपासून गुप्तचर आधिकाऱ्यांचे लक्ष होते. त्याचे व्यवहार संशयास्पद असल्याची खात्री झाल्यावरच काल रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान आणि निवासस्थानावर एकाच वेळी धाड टाकण्यात आली. आज सकाळी अकरापर्यंत 14 तासांहून अधिक काळ ही तपासणी चालली होती. यात त्याचे सर्व व्यवहार आणि कागदपत्रांसह अन्य बाबींची माहिती घेण्यात आली. बरेच काही संशयास्पद मिळाल्याने या व्यापाऱ्यास पुण्यास नेण्यात आले आहे. 

यामुळेच उघडकीस येतात घोटाळे 
केंद्रीय जीएसटी विभागाने कर भरण्यासाठी तयार केलेल्या संगणकीय यंत्रणेतील बारकाव्यांमुळे अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या दीड महिन्यात केंद्रीय जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने 11 हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी एक हजार 100 हून अधिक जण कोठडीची हवा खात आहेत, 400 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वसूलही झाली आहे. 

संपादन : युवराज यादव 

loading image