पालकमंत्र्यांच्या अभिनंदनास कोण गेलं आडवं? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

विषय समितीच्या सभापतींना खातेवाटप करण्यासाठी ही विशेष सभा बोलावण्यात आली होती. अध्यक्ष राजश्री घुले अध्यक्षस्थानी होत्या. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी एक हजार खोल्या तीन वर्षांत पूर्ण करून देण्याची घोषणा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. त्याबाबत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेच्या सुरवातीलाच करण्यात आला. 

नगर ः पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाच्या ठरावाला जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्य राजेश परजणे यांनी विरोध केला. त्यामुळे सभेत सुरू झालेली गरमागरमी अखेरपर्यंत कायम होती. 
विषय समितीच्या सभापतींना खातेवाटप करण्यासाठी ही विशेष सभा बोलावण्यात आली होती. अध्यक्ष राजश्री घुले अध्यक्षस्थानी होत्या. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी एक हजार खोल्या तीन वर्षांत पूर्ण करून देण्याची घोषणा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. त्याबाबत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेच्या सुरवातीलाच करण्यात आला. 

...मग सत्कारच करू ना 
त्याला आक्षेप घेत परजणे म्हणाले, की बांधकाम पूर्ण होऊ द्या, आपण त्यांचा सत्कार करू. त्यानंतर सचिव वासुदेव सोळंके यांनी विषयसूची वाचण्यास सुरवात केली, त्या वेळीही परजणे यांनी आक्षेप घेतला. "विषयपत्रिका चुकलेली आहे. सभापती निवडीचा कार्यक्रम प्रथम घेऊन, नंतर पदभाराबाबत विषय मांडणे गरजेचा आहे. पदभाराचा विषय आधी कसा घेतला?' असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावर अनिल कराळे, हर्षदा काकडे यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. त्याच वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, "पहिला विषय निवडणुकीचा हवा होता. त्यानंतर खातेवाटपाचा विषय घेणे गरजेचे होते,' असा मुद्दा मांडून प्रशासनाची चूक कबूल करून दुरुस्तीच्या सूचना दिल्या. त्यानंतर या वादावर पडदा पडला. 

प्रशासनास धरले धारेवर 
या वेळी विषय समित्या सभापतींना खातेवाटपाचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, असा ठराव संदेश कार्ले यांनी मांडला. त्याला सर्व पक्षांच्या प्रतोदांनी अनुमोदन दिले. विषय समित्यांच्या सभापतींचा व नंतर सर्व पंचायत समित्यांच्या सभापतींचा सत्कार करण्यात आला. या वेळीही "प्रशासनाने प्रथम अध्यक्षांचा सत्कार करणे गरजेचे आहे,' असा मुद्दा मांडून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे प्रशासनाने अध्यक्षांचा सत्कार केल्यानंतर पुढील सत्कार सुरू झाले. 

तो विषय सभेत नको 
नेवासे तालुक्‍यातील रस्त्यांच्या कडेने गॅस पाइपलाइन टाकण्यास भारत गॅस रिसोर्सेस कंपनीला परवानगीचा विषय सभेसमोर आला. मात्र, हा विषय आजच्या सभेत नको, असा सूर उमटल्याने आता त्यावर आधी स्थायी समितीत चर्चा होईल आणि नंतर तो सर्वसाधारण सभेत मंजुरीला येईल, असे अध्यक्ष राजश्री घुले व सभापती सुनील गडाख यांनी सांगितले. 

परजणे यांनी केला निषेध 
"शालिनी विखे पाटील यांनी गेली पावणेआठ वर्षे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचा कारभार पाहिला. त्यांनाच सभागृहात बोलू दिले जात नाही. सभागृहाचे कामकाज हुकूमशाही पद्धतीने सुरू झाले आहे. या प्रवृत्तीचा निषेध करत आहे,' असे म्हणत सदस्य राजेश परजणे यांनी संतप्त भावना सभागृहात व्यक्त केल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian ministers are opposed Of them