शुक्रवारची गोवा ट्रिप, पालकांना इशारा

Guardians Gint by Kolhapur Youth Goa Gambling Case.gif
Guardians Gint by Kolhapur Youth Goa Gambling Case.gif

कोल्हापूर  : कोल्हापुरातून गोव्याला तरुणांनी जुगार खेळण्यासाठी यावे, यासाठी कोल्हापुरात खास व्यवस्था आहे. जुगार खेळण्यासाठी आठ-दहा जण तयार झाले की इथले काही जण त्यांच्यासाठी गाडीची खास सोय करतात. कारण इथले हे तरुण त्यांच्यासाठी "बकरी' असतात. त्यांना फुकट गोव्याला न्यायचे. जुगारात त्यांचे पैसे संपवायचे. पैसे संपल्यावरही त्यांना व्याजाने पैसे देऊन खेळवत गुंतवायचे व त्याला पुरता रिकामा करून पुन्हा कोल्हापूरला आणून सोडायचे हे त्यांचे तंत्र आहे. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, याबाबत पालकांनीच अलर्ट होण्याची गरज आहे.

हे पण वाचा -  सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात 

आज मितीला या जुगारामुळे किंवा गोव्यातल्या समुद्रावरचा जुगार खेळण्यासाठी घेतलेल्या व्याजाच्या पैशामुळे कोल्हापुरातील अनेक तरुण देशोधडीला लागले आहेत. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, दोन रात्री तेथे तो काय करतो, त्याला गोव्याला का नेले जाते, याची चौकशी पालक करीत नाहीत किंवा हे तरुण जुगाराचे इतके व्यसनी झाले आहेत की ते घरच्यांची फिकीरच करीत नाहीत. हे तरुण कर्जबाजारी झाले आहेत आणि त्यांना व्याजाने पैसे पुरविणारे मात्र लक्षाधीश झाले आहेत. ते या तरुणांना जुगार खेळायला पैसे पुरवितात व नंतर अक्षरशः राक्षसी प्रवृत्तीने पैसे वसूल करतात. त्यामुळे अनेकांना आपली मालमत्ता विकायला लागली आहे.

हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....  
 

पण, आपला मुलगा गोव्यात जुगार खेळायला जाऊन कर्जबाजारी झाला, असे कसे सांगायचे हे पालकांसमोरचे कोडे आहे. आणि ते पैसे पुरवून-पुरवून अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. तक्रार कोठे व कशी करायची, हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. कारण जुगार खेळण्यासाठी व्याजाने पैसे पुरविणाऱ्यांची दहशत मोठी आहे. एवढेच नव्हे तर वसुलीसाठी त्यांनी कमिशनवर गुंड पोसले आहेत. विशेषतः गुजरी परिसरात त्यांचा सातत्याने वावर आहे. अनेक पालक हडबडून गेले आहेत. पण, आवाज उठवायची चोरी आहे.

हे पण वाचा -  त्या पॅटर्नबाबत गृहराज्यमंत्र्यांनी केला हा दावा 

कोल्हापूर ते गोवा ही जुगाराची साखळी कशी जुळली, याचे कारण इथले जुगार व मटकावाले आहेत. कोल्हापुरात अलीकडच्या काळात या जुगार व मटकावाल्यांनी तरुण वर्गात आपले जाळे पसरविले आहे. एखाद्या पेठेतील तरुणाचा वाढदिवस असेल तर हे जुगारवाले, मटकावाले किंवा त्यांचे साथीदार आपल्या खर्चाने त्या तरुणाचा डिजिटल फलक उभा करतात. रात्री चौकात मांडव घालतात. केक, डीजे, हार-फुलांचा खर्च करतात. दुचाकी वाहनांचा ताफा घेऊन या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते येतात. असल्या जंगी वाढदिवसामुळे तरुणही भुलतात आणि या जुगारवाल्यांचे समर्थक बनतात. काही जुगारवाले विशेषतः रात्रीचे मर्यादित ओव्हरचे क्रिकेट सामने भरवतात. त्यानिमित्त तरुणांना एकत्रित करतात. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यातील काही जुगारवाल्यांना निमंत्रित करतात. या जुगारवाल्यांच्या खर्चाने जंगी सोहळा कोल्हापुरात साजरा करतात. या वातावरणालाही तरुण भुलतात आणि ते जुगाराच्या जाळ्यात अलगद सापडतात.

रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज
कोल्हापुरात एक वर्ग या समुद्रातील जुगारात गुरफटून देशोधडीला लागला आहे. कोठेही बोलायची चोरी इतकी व्याजाने पैसे पुरविणाऱ्यांची दहशत आहे. कोल्हापुरातला एक मोठा वर्ग यात बरबाद होण्यापूर्वी कोल्हापुरातील ज्येष्ठांनी, तालमीच्या प्रमुखांनी, एका विशिष्ट समाजाच्या प्रमुखांनी, व्यापारी संस्थांच्या संचालकांनी पुढे येऊन हे रोखण्याची गरज आहे. गोव्यातला जुगार कायदेशीर आहे. तो सुरूच राहणार आहे. पण, हा जुगार खेळण्यासाठी व्याजाने पैसा पुरविण्याचा धंदा करणाऱ्यांना रोखणे हे कोल्हापूरकरांच्या हातात आहे. नाही तर तरुणांची एक मोठी पिढी यात बरबाद होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com