esakal | गुढी उभारू जबाबदारीची...  बंदपेक्षा निर्बंध बरे

बोलून बातमी शोधा

Gudi of Responsibility... Restrictions are better than closure

यापुढे आपल्याला कोरोनाला चकवा देत...सुरक्षित अंतरावर ठेवत जगायचे आहे. नित्य जगणे-व्यवहार सुरू ठेवायचे आहे

गुढी उभारू जबाबदारीची...  बंदपेक्षा निर्बंध बरे

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली  : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात पुन्हा एकदा टाळेबंदीचे सावट निर्माण झाले आहे. यदाकदाचित शासन काही काळासाठी टाळेबंदी लागू करेलही. गर्दी टाळण्यासाठी तो शेवटचा उपाय असेल. मात्र यापुढे आपल्याला कोरोनाला चकवा देत...सुरक्षित अंतरावर ठेवत जगायचे आहे. नित्य जगणे-व्यवहार सुरू ठेवायचे आहे. हा कालावधी काही महिन्यांचा आणि कदाचित काही वर्षांसाठीचाही असू शकेल. जीवनाची ही गती कायम ठेवून कसे ते नियमन कसे करता येईल, यावर त्या त्या क्षेत्रातील जाणकारांकडून आलेल्या या काही सूचना... 


व्यापारी 

 •  रस्त्यावरील सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना मुख्य बाजारपेठांच्या बाहेर न्यावे. 
 •  बाजारपेठांबाहेरील रस्त्यावर वीस-पंचवीस फुटा अंतराने विक्रेत्यांना जागा द्या. 
 •  बाजारपेठेतील दुकानांची वेळ सकाळी 9 ते 5 ठेवावी. 
 •  सायंकाळी पाचनंतर बाजारपेठेत संचारबंदीची अंमलबजावणी करावी. 
 •  प्रतीक्षेतील ग्राहकांसाठी चौकोन आखून सुरक्षित अंतर ठेवावे. 
 •  संचारबंदी काळात सर्व अत्यावश्‍यक सेवाही बंद कराव्यात. 
 •  प्रशासनाने बाजारात कायमस्वरूपी टास्क फोर्स ठेवावेत. 

हॉटेल 

 •  दोन टेबलमधील अंतर सात ते आठ फूट करावे. 
 •  कुटुंबालाच एका टेबलावरच बसता येईल. 
 •  वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे टेबल सक्तीचे असेल. 
 •  वेटिंग पद्धत सुरू करता येईल. 
 •  शक्‍य त्या ठिकाणी बफे सिस्टिम करणे. 
 •  स्वयंपाकी, वेटर मंडळींची आठवड्यातून कोरोना तपासणी. 
 •  कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण सक्तीचे करावे. 
 •  "यूज अँड थ्रो' पद्धतीची ताटे, वाट्या, पेले वापराची सक्ती करावी. 
 •  ग्राहकांना ताप, सर्दी, खोकला असेल तर प्रवेश नाकारावा. 

भाजीपाला 

 •  किमान पाच ते सात फूट अंतरावर बसावे. 
 •  मास्क, सॅनिटायझरचा सक्तीने वापर करावा. 
 •  ग्राहकांशी फार जवळून संवाद टाळून व्यवहार. 
 •  ग्राहकांनी भाजीपाला तपासून बघणे टाळावे. 
 •  पैसे घेतल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करावा. 
 •  भाजी विक्रेत्यांची आठवड्यातून मोफत कोरोना चाचणी करावी. 
 •  भाजी विक्रेत्यांना तपासणी व लसीकरणाचे प्रमाणपत्र सक्तीचे करावे. 
 •  बाजार समितीत सौद्याच्या वेळा वाढवाव्यात. त्यासाठी आगाऊ प्रवेश नोंदणी करावी. 
 •  कुटुंबासह भाजीपाला खरेदीस मनाई करावी. 
 •  मंडईमधील बाजार बंद करून खुल्या भूखंडावर विनागर्दीच्या रस्त्यांवर बाजार भरवावेत. 

सराफ पेठ 

 •  गर्दी टाळण्यासाठी दुकानाच्या क्षेत्रफळानुसार ग्राहकसंख्या निश्‍चित करावी. 
 •  सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत दुकाने उघडी ठेवावीत. 
 •  45 वर्षांपुढील कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल. 
 •  सर्व कर्मचाऱ्यांची दर आठवड्याला कोरोना चाचणी बंधनकारक करावी. 

प्रवासी वाहतूक 

 •  कर्मचाऱ्यांची नियमित कोरोना चाचणी सक्तीची करावी. 
 •  उभे राहून प्रवास करण्यास मनाई केली आहे. 
 •  एका सीटवर एकच व्यक्ती, कुटुंबालाच एकत्रित प्रवासाची मुभा. 
 •  प्रत्येक फेरीपूर्वी बस निर्जंतुकीकरण सक्तीचे करावे. 
 •  वडाप रिक्षांमध्ये नियमाच्या पन्नास टक्के प्रवाशांनाच मुभा असावी. 
 •  लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी तासभर आधीच आरक्षण घ्यावे. 


व्यायामशाळा-मैदाने 

 •  जीमसाठी प्रत्येकाला बॅच ठरवून देता येईल. 
 •  एकावेळी किमान दहा जणांना एंट्री देता येईल. 
 •  व्यायामाचे साहित्य निर्जंतुकीकरण करावे लागेल. 
 •  व्यायामापूर्वी ऑक्‍सिजन पातळी व तापमानही मोजावे. 
 •  योगासाठीही याच पद्धतीने उपाययोजना करता येतील. 
 •  मैदानावरही पळणे, चालणे अशा वैयक्तिक खेळाला परवानगी देता येईल. 
 •  बॅडमिंटन व टेनिस खेळासाठी जीमप्रमाणे उपाय करता येतील. 

उद्योग 

 •  प्रत्येक कामगारांची नियमित आरोग्य तपासणी सक्तीची करा. 
 •  अधिक शिफ्टमध्ये काम सुरू ठेवून कारखान्यातील गर्दी कमी करा. 
 •  आठवड्यातून एकदा कारखान्यात निर्जंतुकीरण करता येईल. 
 •  पंधरा दिवसांतून एकदा कामगारांची वैद्यकीय तपासणी करता येईल. 
 •  सर्वच कामगारांसाठी लसीकरण सक्तीचे करा. 

संपादन : युवराज यादव