गुरूजींनी वयाच्या नव्वदीत दिला दीड लाखाचा किराणा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

गारगुंडी येथील रहीवाशी व सध्या सेवानिवृत्त असलेले  प्राथमिक शिक्षक शंकर धोंडीबा झावरे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या वेतनामधून सुमारे एक लाख 35 हजार रूपयांच्या किराणामालासह जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य तहसीलदार देवरे यांच्याकडे सुपुर्त केले.

पारनेर ः गारगुंडी येथील सेवानिवृत्त शिक्षकशंकर झावरे यांनी आपल्या सेवानिवृत्ती वेतनातून  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दोनशे कुटुंबाना 15 दिवस पुरेल एवढे किराणा मालाचे साहित्य सुमारे एक लाख 35 हजार रूपयांचे सुपूर्द केले. 

गारगुंडी येथील रहीवाशी व सध्या सेवानिवृत्त असलेले  प्राथमिक शिक्षक शंकर धोंडीबा झावरे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या वेतनामधून सुमारे एक लाख 35 हजार रूपयांच्या किराणामालासह जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य तहसीलदार देवरे यांच्याकडे सुपुर्त केले. या साहित्याचे  तालुक्यातील गरजू व  गोरगरीब कुटुंबांसाठी वाटप करण्यात येणार असल्याचे तहसीलदार देवरे यांनी सांगितले.

हेही वाचा - निघोजच्या त्या लोकांचा अहवाल निगेटीव्ह

आज प्रातिनिधिक स्वरूपात पारनेर शहरातील काही गरजूंना या साहित्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी झावरे यांच्यासह तहसीलदार देवरे, नगराध्यक्ष वर्षा नगरे, उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट, शंकराव नगरे, भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनित कुमावत सहायक पोलीस ऊपनिरीक्षक बालाजी पदमने आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यात उदरनिर्वाहासाठी  मराठवाडा व इतरही परराज्यातून अनेक मजूर मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांना दोन वेळच्या अन्नाची फार गरज आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार  सेवानिवृत्त शिक्षक झावरे यांनी हा मदतीचा हात दिला आहे.

झावरे हे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून 1990 साली सेवानिवृत्त झाले आहेत.सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचार बंदी आहे त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची उपासमारीची वेळ आली आहे. अशा काळात  कुणी उपाशी राहता कामा नये या भावनेतून त्यांनी हे दान दिले आहे. 

झावरे यांनी या पुर्वी मंगरूळ पारगाव येथील वाचनालयास सुमारे तीन हजार पाचशे ग्रंथ दिले आहेत. गारगुंडी येथील शाळा खोल्यांसाठी मोठी देणगी दिली आहे. व  सव्वा लाख रूपयांची स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकेही एका वाचनालयास भेट दिली आहेत. 

कोरोना आजाराचे आंतरराष्ट्रीय संकट  देशासह राज्यावर घोंगावत आहे  तालुक्यातील बागायती भागात व बांधकाम क्षेत्रामध्ये कामकरणारे अनेक मजूरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना अन्नासह  इतर जीवनावश्यक वस्तूंची फार मोठी गरज आहे.  झावरे बाबांचा आदर्श इतरांनी घ्यावा व आपल्या निवृत्ती वेतनातून दिलेल्या देणगीचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे.-ज्योती देवरे, तहसीलदार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guruji gave one and a half lakh grocery at the age of ninty