
सकाळ स्कूल क्रिकेट लीगच्या उद्घाटनापूर्वी सकाळच्या सत्रात गुरुकुल स्कूल आणि महाराजा सयाजीराव विद्यालय यांच्यात सामना झाला. ज्येष्ठ क्रीडा संघटक सुधाकर शानभाग यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. त्या वेळी ऍड. कमलेश पिसाळ, इर्शाद बागवान, दुर्वास कांबळे, किरण राजेभोसले, विनोद वांद्रे, उमेश वेलणकर, किरण जावळे, नितीन बनसोडे, अभिजित देशमुख आदी उपस्थित होते. या सामन्यातून शार्दुल फरांदे यास सुरेश साधले यांच्या हस्ते "सामन्याचा मानकरी' पारितोषिक देण्यात आले.
सातारा : शार्दुल फरांदे आणि आर्य जोशी यांची 107 धावांची दमदार भागीदारी आणि शार्दुल फरांदे आणि अद्वैत प्रभावळकर यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून सुरू झालेल्या सकाळ स्कूल क्रिकेट लीग स्पर्धेत गतविजेत्या गुरुकुल स्कूलने महाराजा सयाजीराव विद्यालय संघावर तब्बल 106 धावांनी विजय मिळविला. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.
गुरुकुल स्कूलने नाणेफेक जिंकली. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुरुकुलचा कर्णधार शार्दुल फरांदे व सिद्धार्थ शितोळे या सलामीच्या जोडीने 3.5 षटकांत 28 धावा केल्या. सिद्धार्थला सौमित्र करचेने त्याच्याच गोलंदाजीवर 13 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर शार्दुलच्या साथीत आर्य जोशी मैदानात आला. दोन्ही फलंदाजांनी सयाजीराव विद्यालयाच्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. कधी चौकार, तर कधी षटकार ठोकत प्रेक्षकांची मने जिंकली. दोघांची 107 धावांची भागीदारी झाली. 11.5 षटकांत संघाची धावसंख्या 107 असताना आर्यला उर्जितसिंग पवारने त्रिफळा बाद केले. आर्यने 29 चेंडूंत दोन षटकारांसह आठ चौकार ठोकत 51 धावा केल्या. आर्य पाठोपाठ शार्दुल संघाची धावसंख्या 136 असताना यशराज खताळच्या चेंडूवर शार्दुलने मारलेला फटका सौमित्र करचेने टिपला. शार्दुलने 39 चेंडूंत पाच चौकारांसह 42 धावा केल्या. गुरुकुलच्या निर्धारित 20 षटकांत 4 बाद 190 धावा झाल्या.
नक्की वाचा - माेना स्कूल, एसईएमएसची बाजी
सिद्धार्थ शितोळे 13 (14 चेंडूंत दोन चौकार), प्रथमेश वेळेकर 12 (6 चेंडूंत दोन चौकार), सिद्धेश गोरे नाबाद 27 (22 चेंडूंत तीन चौकार), हर्ष जाधव नाबाद 24 धावा (13 चेंडूंत तीन चौकार), तसेच संघास 21 अवांतर धावा मिळाल्या. महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या सौमित्र करचे, यशराज खताळ, उर्जितसिंह पवार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी खूषखबर; एक फेब्रुवारीपासुन कर्ज होणार जमा
विजयासाठी 191 धावांचे उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेल्या महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या संघास गुरुकुल संघाने 12.5 षटकांत 84 धावांत गारद केले. महाराजा सयाजीरावच्या मंदार चोपडे 14, क्षितीज मोहिते 16, प्रसाद जाधव नाबाद 11 धावा या खेळाडूंव्यतिरिक्त एकासही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. शार्दुल फरांदेने दोन षटकांत आठ धावा देऊन तीन गडी बाद केले, तसेच अद्वैत प्रभावळकरने 1.5 षटकांत दहा धावांत दोन, तर अरमान मुल्ला, पार्थ सावंत यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हेही वाचा - त्या प्रकरणातून उदयनराजेंसह सर्वांची निर्दाेष मुक्तता